
अरविंद जाधव-
Nashik News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी 14 जानेवारीपासून भारत न्याय यात्र काढणार आहेत. या दरम्यान राहुल गांधी नाशिक आणि मालेगाव मार्गे जातील. 20 मार्च रोजी संपणाऱ्या या यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात ते नाशिकमध्ये असतील. त्यावेळी लोकसभेची रणधुमाळी शिगेला पोहचलेली असेल. यामुळे मरगळ आलेल्या नाशिकमधील काँग्रेसला संजीवनी मिळणार काय, असा प्रश्न उपस्थित होतो.
नाशिकचा लोकसभेच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास येथे तीन मतदार संघ येतात. यातील नाशिक जिल्ह्यातील दोन मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लढले आहेत. तर धुळ्यातील तीन आणि मालेगावमधील तीन विधानसभा मतदार संघ मिळून तयार होणाऱ्या तिसऱ्या लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी(BJP) आणि काँग्रेसमध्ये थेट लढत असते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या तीनही मतदार संघावर सध्या शिवसेना (शिंदेगट) आणि भाजपाची सत्ता आहे. अर्थात नवीन राजकीय समीकरणे अद्याप समोर आलेली नाहीत. नाशिकमध्ये काँग्रेसची अवस्था फारच बिकट असून, मुळापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची वाणवा आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही वेळा दौरे करून काँग्रेसची मरगळ दूर करण्याचा प्रयत्न केला खरा मात्र पक्षातील पदाधिकाऱ्यांची अंतर्गत गटबाजी लक्षात घेत तेही दोन हात लांब राहिले. आता न्याय यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी(Rahul Gandhi) नाशिकसह मालेगावमध्ये पोहचणार आहेत.
विशेष म्हणजे या यात्रेची सुरूवात मणिपूर येथून 14 नोव्हेंबर रोजी सुरू होऊन 20 मार्च रोजी संपणार आहे. ईशान्यातील मणिपूर ते मुंबई असा या यात्रेचा प्रवास असणार आहे. ही यात्रा 14 राज्यातून सहा हजार 200 किमी अंतर पार करणार आहे. यात्रेच्या प्रवासाचा टप्पा लक्षात घेता राहुल गांधी लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला असतानाच नाशिक जिल्ह्यात असतील अशी शक्यता आहे.
इगतपुरीमध्ये हिरामण खोसकर यांच्या रूपाने काँग्रेस पक्ष जिल्ह्यात कार्यरत असल्याची एक पावती मिळते. मात्र शहरासह जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती विस्कटलेली आहे.दरम्यान, सात वर्षे प्रभारी म्हणून जिल्हा काँग्रसच्या अध्यक्षपद सांभाळणाऱ्या शरद आहेर यांना बाजुला सारीत नाना पटोले(Nana Patole) यांनी अड. आकाश छाजेड यांची दोन महिन्यांपूर्वी नियुक्ती केली खरी, मात्र ही निवड सुद्धा प्रभारीच आहे. एकंदरीत ‘प्रभारी’ कारभार हाकणाऱ्या काँग्रेसला राहुल गांधीच्या दौऱ्यामुळे नवसंजीवनी मिळेल काय, हाच प्रश्न मोठा आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.