नागपूर : शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव राऊत यांच्या घरी लग्न सोहळे नुकतेच पार पडले. आता लग्नाचा धुमधडाका आहे, तो महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या घरी. उद्या त्यांच्या मुलीचा विवाह सोहळा पुणे येथे होऊ घातला आहे.
नाना पटोले यांनी या लग्नाचे निमंत्रण सर्वपक्षीय नेत्यांना दिले आहे. उद्या पुणे येथे जवळपास सर्वच राजकीय पक्षांतील नेते, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार, हा विवाह सोहळा नाना पटोलेंचा गृहजिल्हा असलेल्या भंडारा किंवा नागपूर येथे होणार होता. पण सध्या महाराष्ट्राची स्थिती फारशी चांगली नाहीये. अतिवृष्टी आणि त्यानंतर शेतकऱ्यांवर विविध संकटे आली आणि आत्ता आत्ता कोरोनाच्या तिसऱ्या व्हेरीअंटचा प्रकोप वाढणार असल्याची शक्यता लक्षात घेता नाना पटोलेंनी कमित कमी पाहुण्यांमध्ये हा लग्न सोहळा पुणे येथे आयोजित केला असल्याचे सांगण्यात येते आहे.
नाना पटोलेंनी निमंत्रण दिलेले बव्हंशी नेते मुंबईत आहेत. तेथूनच ते पुणे येथे जाणार असल्याचे कळते. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज नागपुरात आहेत. त्यामुळे ते लग्नाला जाणार की नाही, याबद्दल नेमकी माहिती मिळू शकली नाही. पण कॉंग्रेसचे विदर्भातील सर्व मंत्री लग्नाला उपस्थिती दर्शवणार असल्याची माहिती आहे. नाना पटोले यांची कन्या निता पटोले आणि व्यावसायीक रोहन काळभोर यांचा विवाह उद्या सकाळी पुणे येथे होणार आहे. नानांचे निकटवर्तीय पुण्यात पोहोचले आहेत. राजकीय नेते पाहुणे उद्या वेळेवर पोहोचून या सोहळ्याला उपस्थिती दर्शवणार असल्याची माहिती आहे.
संजय राऊत यांच्याकडील लग्नामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊत यांचा डान्स राज्यासह देशभर चर्चेचा विषय झाला. त्यावर क्रिया प्रतिक्रिया उमटल्या. येवढ्या की सुप्रिया सुळे यांना त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले. गुलाबराव पाटील यांच्याकडील लग्नातील गर्दी (विनामास्क) राज्यभर चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे महाराष्ट्र अडचणीत असताना त्यातल्या त्यात शेतकरी अडचणीत असताना आपण या वादात पडायला नको, म्हणून शेतकरी नेते असलेल्या नानांनी कमीत कमी लोकांमध्ये लग्न सोहळा आटोपता घेण्याचा निर्णय घेतला असल्याचीही माहिती आहे. राज्याचा विचार करून पटोलेंनी हा निर्णय घेतला असेल, तर राज्यात या निर्णयाचे स्वागत होईल, यात शंका नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.