Akola Fadanvis News : फडणवीसांचा ‘हा’ जिल्हा सोसतोय भारनियमनाचे चटके, कुठे कमी पडली ‘ऊर्जा’?

Citizens of Akola : वेळीअवेळी खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे अकोल्यातील नागरिकांचा संताप वाढत आहे.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

Akola Political News : लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय आरोप-प्रत्यारोप व आंदोलनांच्या मशाली पेटत आहेत. अशात वऱ्हाडातील महत्त्वाचे राजकीय केंद्र असलेल्या अकोला शहरात असलेल्या असुविधांना पुढे करीत आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी सरसावली आहे. (The anger of the citizens of Akola is increasing)

गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात आपत्कालीन भारनियमन सुरू करण्यात आले आहे. या आपत्कालीन भारनियमनाच्या नावाखाली जिल्ह्याच्या अनेक भागांतील वीजपुरवठा तासन् तास खंडित करण्यात येतो. भारनियमन नसले तरी अकोल्यातील वीजपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली दररोज किमान दीड ते दोन तास खंडित असतो. वेळीअवेळी खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे अकोल्यातील नागरिकांचा संताप वाढत आहे.

Devendra Fadanvis
Sarkarnama Podcast : लातूरकरांचा चिमटा, मातब्बराचा पराभव

नागरिकांच्या या संतापाचा फायदा घेण्यास आता सत्ताधारी भाजपच्या विरोधकांनी सुरुवात केली आहे. महावितरणच्या कार्यालयात अलीकडेच ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. परंतु त्यांचे लक्ष्य होते भाजप. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. तेच राज्याचे ऊर्जामंत्री आहेत. त्यांच्याकडेच पालकत्व असलेल्या जिल्ह्याला भारनियमनाचे चटके सोसावे लागत असल्याचा प्रचार आता शिवसेनेचा ठाकरे गट करीत आहे. फडणवीसांची ‘ऊर्जा’ कुठे कमी पडली, असाही सवाल विरोधक विचारत आहेत.

आगामी काळात उत्सव असल्याने भारनियमन करण्यात येऊ नये, अशी मागणी अकोला भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. परंतु महावितरणने आपल्या नियमांची फूटपट्टी आडवी आणली. अकोल्यात सर्वाधिक वीजगळती व वीज चोऱ्या असल्याने भारनियमन थांबविता येणार नाही, असे स्पष्टच सांगितले. त्यामुळे सर्वच नेत्यांना गप्प बसावे लागले.

भारनियमनाचे चटके मात्र सामान्यांना सोसावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अकोल्यात कोट्यवधी रुपये खर्च करीत अशोक वाटिका चौकापासून उड्डाणपूल उभारण्यात आला. परंतु अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा पूल सहा महिन्यांतच बंद पडला. आता पुलाचा काही भाग जमीनदोस्त करण्यात येत आहे. काँग्रेस आणि ठाकरे गट दोघांनीही या पुलाजवळ आंदोलन व फलकबाजी करीत नागरिकांचे लक्ष वेधले.

असाच काहीसा प्रकार बस स्थानक चौकातील अंडरपासबद्दल आहे. पाऊस नसला तरी या अंडरपासमध्ये आसपासच्या नाल्यांमधील पाणी तुंबते. त्यामुळे बनल्यापासून अर्धाअधिक वेळ हा अंडरपास बंदच असतो. अंडरपास करण्याचा हा प्रकारही फसल्याचा प्रचार आता भाजप विरोधक करीत आहेत. काटेपूर्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कालबाह्य झाल्याने येथे तात्पुरता पूल उभारण्यात आला. हा पूल नदीला आलेल्या एकाच पुरात वाहून गेला.

वाहून गेलेल्या या पुलाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची मतदारांमध्ये चांगलीच नाचक्की चालविली आहे. (Akola) अकोला-शेगाव मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे कामही खोळंबले आहे. केवळ बैठकी व आश्वासनांच्या भरवशावर या पुलाचे काम सुरू आहे. विरोधकांना सत्ताधारी भाजपविरोधात (BJP) आणखी एक मुद्दा मिळाला आहे, तो म्हणजे महापालिकेने (Municipal Corporation) केलेली करवाढ. या करवाढीच्या विरोधात शहरात सध्या स्वाक्षरी अभियान सुरू आहे.

या स्वाक्षरी अभियानातून फारसे काही निष्पन्न होईल किंवा करवाढ रद्द होईल, असे नसले तरी मतदारांमध्ये संताप निर्माण करण्याचे काम महाविकास आघाडीकडून सुरू आहे. या कामात ठाकरे गट आघाडीवर आहे. काही महिन्यांपूर्वी अकोल्यात जातीय दंगल झाली. त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला जिल्ह्याला भेट देतील, असे वाटत होते. परंतु फडणवीस अकोल्याकडे फिरकलेदेखील नाहीत. अकोला दंगलीत होरपळत असताना फडणवीस व त्यांचे सरकार कुठे होते, असा सवाल करणारा प्रचारही अकोल्यात आता सुरू झाला आहे.

Devendra Fadanvis
Akola Kawad Yatra : अकोल्यातील कावड उत्सवात राजकीय पक्षांचे जोरदार शक्तिप्रदर्शन !

अकोला जिल्ह्यातील एक एक समस्या, मुद्दे शोधून काढत नागरिकांमध्ये असंतोष निर्माण करण्याची कोणतीही संधी विरोधक सोडताना दिसत नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून अकोल्याचे खासदार संजय धोत्रे आजारी आहेत. आमदार गोवर्धन शर्मा यांचीही प्रकृती ठीक नाही. या दोन्ही नेत्यांच्या अनारोग्याचा मुद्दाही चर्चेला आणला जात आहे.

शिवसेनेचा ठाकरे गट सध्या अकोला जिल्ह्यातील ९०० गावांमध्ये फिरून या असंतोषाची ज्वाला मतदारांमध्ये भडकवण्याचे काम करीत आहे. त्याला मतदार कितपत साथ देतात, हे निवडणूक काळात कळेलच. परंतु एकूण अकोला जिल्ह्यातील समस्या व विकासाकडे सध्यातरी कुणाचेच लक्ष नाही ना विरोधकांचे ना सत्ताधाऱ्यांचे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

Edited By : Atul Mehere

Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Statement: शासनाची पाठराखण करताना फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com