

Amravati News : अमरावती जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या 4 ऑक्टोबरला संचालक मंडळाची मुदत संपत असलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासन नियुक्त करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.
या निर्णयास विरोध करण्यात येत असून निवडणुका घ्या, अशी मागणी करतानाच आर्थिक अधिकार काढून विद्यमान संचालक मंडळास मुदतवाढ देण्याची मागणी करीत विद्यमान संचालक मंडळाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेणे हे प्राधिकरणाचे कर्तव्य आहे. मात्र प्राधिकरणाकडून विनाकारण निवडणूक प्रक्रिया लांबविली जात असल्याचा आरोप संचालक मंडळाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुकीचा कालबद्ध कार्यक्रम त्वरित आखण्यात यावा, ते शक्य नसल्यास कोणतेही आर्थिक व्यवहार न देता विद्यमान संचालक मंडळालाच मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका संचालक मंडळाकडून उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने शासनाला आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे आता शासन याप्रकरणी न्यायालयात काय भूमिका मांडते, तसेच विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याबाबत अथवा प्रशासक नियुक्तीबाबत काय भूमिका घेते, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.