

Amravati Mahapalika : अमरावती महापालिका निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत युवा स्वाभिमानने 15 जागा जिंकून विक्रम करण्यासोबतच भाजपला सत्तेसाठी आपल्या पिचवर खेळण्यासाठी येण्यास भाग पाडले आहे. भाजपला गतवेळीपेक्षा तब्बल 20 जागांचे नुकसान झाले असून 25 जागांवरच समाधान मानण्याची वेळ आली. यातील डझनभर जागा युवा स्वाभिमान पक्षामुळे पडल्याचे चित्र आहे. काँग्रेसने 15 जागा जिंकत इभ्रत वाचविली असून राष्ट्रवादीचा मात्र उदय झाला. या पक्षाने 11 जागा जिंकल्या. एमआयएमने यावेळीही जोरदार प्रदर्शन करीत 12 जागा जिंकल्या.
महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून 87 जागांवरील विजयी पक्षीय उमेदवार जाहीर झाले आहेत. अनेक बड्या दिग्गजांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. भाजपने यावेळी रिंगणात 68 जागांवर उमेदवार दिले होते. तर 6 जागी अपक्षांना समर्थन दिले. मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री, राज्यमंत्री व दीड डझन आमदारांची फौज कामी लावल्यावरही गतवेळचे वैभव भाजपला मिळवता आले नाही. गतवेळी 45 जागा जिंकणारा भाजप यावेळी 25 जागांवर थांबला. तब्बल 20 जागांचे नुकसान झाले असून घोषित निकालांमध्ये भाजप महापालिकेत सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर येऊ शकला.
राष्ट्रवादीला ठेवणार बाहेर?
महापालिकेत बहुमतासाठी 45 जागांची गरज असून भाजप 25 जागांसह सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. म्हणजे भाजपला अजून 20 जागांची गरज आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे 15 नगरसेवक सोबत घेतल्यानंतर आणखी 5 जागा कमी पडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने युवा स्वाभिमान युतीत असेल आम्ही बाहेरच थांबणार अशी भूमिका घेतली आहे. तर युवा स्वाभिमान पक्षही राष्ट्रवादीसोबत युती करण्यास नकार देण्याची शक्यता आहे.
त्यामुळे भाजपला बहुमतासाठी कसरत करावी लागणार आहे. ज्या युवा स्वाभिमान पक्षाने युतीत असूनही ऐनवेळी विरोधात उमेदवार दिले, तब्बल दीड डझन उमेदवार पाडले, नवनीत राणा यांनी भाजपमध्ये राहून युवा स्वाभिमान पक्षाचा प्रचार केला, अशा युवा स्वाभिमानसमोर भाजपला झुकावे लागणार असल्याची वेळ आली आहे. त्यानंतरही 5 जागांसाठी बसप व शिवसेनेची मनधरणी करावी लागणार आहे.
युवा स्वाभिमानचा दबदबा वाढला?
युवा स्वाभिमानने 36 जागांवर उमेदवार देत पंधरा जागा जिंकून राजकीय धक्का दिला आहे. या निकालामुळे आमदार रवी राणा यांचा राजकीय क्षेत्रातील दबदबा वाढला आहे. गतवेळी त्यांच्या सभागृहात केवळ 3 जागा होत्या. 12 जागांचा लाभ त्यांना झाला आहे. एमआयएमनेही 2 जागा अधिक जिंकून गतवेळच्या दहावरून हा आकडा बारावर नेला. एमआयएमचा काँग्रेस व राष्ट्रवादीस अल्पसंख्याक भागात रोखण्यात यश मिळवले आहे. या पक्षाने सभागृहातील दबदबा यावेळी वाढविला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.