

Shiv Sena BJP rebellion news : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यंदा केवळ एका विधानपरिषद जागेची निवडणूक राहिलेली नाही. शिक्षक संघटनांच्या प्रभावातून राजकीय पक्षांच्या सक्रिय सहभागाकडे या मतदारसंघाचा प्रवास झाल्याचे चित्र यावेळी अधिक स्पष्ट झाले आहे.
विद्यमान आमदार किरण सरनाईक आणि माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे हे दोघेही शिवसेनेत दाखल झाल्याने निर्माण झालेला अंतर्गत पेच, भाजपमधील संगीता शिंदे, शेखर भोयर यांचे बंड, काँग्रेसने प्रा. अदिती पोहरे यांना दिलेली उमेदवारी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रा. दत्तात्रय लहाने यांना मैदानात उतरविल्याने निवडणुकीचे स्वरूप बहुकोनी होण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत पक्षीय ताकदीपेक्षा शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आणि संघटनात्मक बांधणी महत्त्वाची ठरणार आहे.
अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश अमरावती शिक्षक मतदारसंघातून २०२०च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून किरण सरनाईक यांनी प्रा. श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला होता. सहा वर्षांनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. दोन्ही नेते आता शिवसेनेत असल्याने पक्षासमोर उमेदवारीचा पेच निर्माण झाला होता.
सरनाईक हे विद्यमान आमदार असल्याने त्यांचा दावा होता, तर देशपांडे यांनी दीर्घकाळ पक्षाशी असलेला संबंध आणि शिक्षक मतदारसंघातील पूर्वीचा अनुभव पुढे केला होता. देशपांडे यांनी पक्षाकडून आणि अपक्ष अशा दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पण अखेर सरनाईक यांनाच एबी फॉर्म देण्यात आला असून ते अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात असणार आहेत. तर पक्षाने उमेदवारी न दिल्यासही निवडणूक लढविण्याची भूमिका देशपांडे यांनी जाहीर केली आहे.
विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीप्रमाणे केवळ पक्षचिन्हावर मतदान होत नाही. उमेदवाराची शिक्षकांशी असलेली प्रत्यक्ष नाळ, शिक्षक संघटनांमधील स्वीकारार्हता, वैयक्तिक संपर्क आणि प्रश्न मांडण्याची प्रतिमा यांना महत्त्व मिळते. त्यामुळे अधिकृत पक्षीय उमेदवाराच्या तुलनेत बंडखोर अथवा अपक्ष उमेदवार किती संघटनात्मक ताकदीने उभा राहतो, यावरही समीकरणे बदलू शकतात. याच ठिकाणी शिक्षक मतदारसंघाच्या राजकारणाचे वेगळेपण समोर येते.
भाजपमध्येही बंडाची ठिणगी
शिवसेनेतील उमेदवारीचा पेच सुटत असतानाच भाजपमधूनही बंडखोरीचे आव्हान उभे राहिले आहे. भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या बहीण संगीता शिंदे आणि शेखर भोयर यांनी अर्ज दाखल केले आहेत. दोघांनीही स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची भूमिका घेतल्याने महायुतीतील अंतर्गत नाराजी उघड झाली आहे. त्यामुळे एका बाजूला शिवसेनेत सरनाईक-देशपांडे यांच्यातील उमेदवारीचा पेच आणि दुसऱ्या बाजूला भाजपमधील शिंदे-भोयर यांची बंडखोरी असे चित्र निर्माण झाले आहे. अधिकृत उमेदवारासोबतच बंडखोर उमेदवार किती संघटनात्मक ताकदीने मैदानात राहतात, यावर निवडणुकीतील मतांचे गणित बदलू शकते.
काँग्रेसची सावध रणनीती
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दत्तात्रय लहाने यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही प्रा. अदिती पोहरे यांची उमेदवारी जाहीर करून आपली भूमिका स्पष्ट केली. पोहरे यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून पक्षाने त्यांना तातडीने उमेदवारी दिली आहे. त्यांना संपूर्ण मतदारसंघात नव्याने राजकीय ओळख निर्माण करण्याची संधी आहे. पण काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार एकाच राजकीय आघाडीतील मतदारांमध्ये स्वतंत्रपणे संपर्क साधणार असल्याने मतविभाजनाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
शिक्षकांचे प्रश्न केंद्रस्थानी येणार?
राजकीय समीकरणे कितीही बदलली तरी या निवडणुकीचा केंद्रबिंदू शिक्षकांचे प्रश्न असणे अपेक्षित आहे. २०२०च्या निवडणुकीत २००५ नंतर नियुक्त शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न महत्त्वाचा होता. आजही जुनी पेन्शन योजना हा शिक्षकांच्या चर्चेतील प्रमुख विषय आहे. त्यासोबत अनुदानित शाळांचे प्रश्न, वेतनातील विसंगती, रिक्त पदे, शिक्षक भरती, अतिरिक्त कामाचा भार, शैक्षणिक संस्थांमधील प्रशासकीय प्रश्न आणि सेवानिवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता हे मुद्दे उमेदवारांच्या अजेंड्यावर येण्याची शक्यता आहे. यामुळे प्रचारात केवळ ‘कोणता पक्ष कोणाच्या मागे?’ यापेक्षा ‘कोणता उमेदवार शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडू शकतो?’ हा प्रश्न महत्त्वाचा ठरेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.