Nagpur News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्ष करीत आहेत. त्यानिमित्ताने दावे व प्रतिदावे केले जात आहेत. नागपूर शहरातील जागावरून महाविकास आघाडीत चांगलीच रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. त्यातच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेला दावा फोल ठरवला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या विरोधात माजी मंत्री अनिल देशमुख हे निवडणूक लढणार याबाबत अद्याप कुठलीही चर्चा झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिण-पश्चिम मतदारसंघावर दावासुद्धा केला नाही, असे सांगून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ( Vijay Vaddetivar) यांनी या चर्चा निष्ठफळ असल्याचे सांगत या दाव्यातील हवाच काढली. (Vijay Vadettivar News)
जागा वाटपाच्या संदर्भात महाविकास आघाडीची अद्याप चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडीची एक बैठक 27 ऑगस्टला ठेवण्यात आली होती. मात्र, आमचे खासदार वसंत चव्हाण यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील तारीख कळेल तेव्हा जागा वाटपांच्या चर्चेला प्रत्यक्ष सुरुवात होईल, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा भाजपचा धंदा आहे. सात राज्यात पैशानेच भाजपने सत्ता मिळवली आहे. घर फोडा पक्ष फोडा हा त्यांचा धंदा आहे. मात्र, त्यांचेच केंद्रातील सरकार कुबड्यांवर सुरू आहे. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.
सुपाऱ्या फेका, नारळ फेका ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. सकल हिंदू समाजाच्या मोर्चांच्या माध्यमातून भाजप मतांचे राजकारण करीत आहे. धर्मात तेढ निर्माण केले जात आहे. उद्रेक होईल असे भाषण केले जात आहे, असे सांगून वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
कंगणा राणावत या मूळातच वादग्रस्त कलावंत आहेत. आता त्या खासदार झाल्या आहेत. त्यांची बुद्धी भ्रष्ट आहे. आधीपासूनच त्या आरोप करीत आहेत. त्यामध्ये आता वाढ झाली असल्याचा आरोप त्यांनी कंगणा राणावत यांच्याबाबत बोलताना त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.