Buldhana : थंड हवेचे ठिकाण म्हणून विदर्भात परिचित असलेल्या बुलढाणा येथील राजकीय वातावरण त्यावेळी तापले ज्यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आडव्या हाताने घेतले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात रविकांत तुपकर यांनी केलेल्या तीव्र टीकेनंतर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शुक्रवारी (ता. 22) चांगलाच संताप व्यक्त केला. त्यामुळे तुपकर यांच्या शेतकरी आंदोलनाला वेगळे वळण लागते की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री कुठे, आमदार कुठे, आपण कुठे काही पात्रता आहे का आपली बोलायची ? आमदार गायकवाड यांचा तुपकरांना टोला लगावला.तर मुख्यमंत्र्यांनी अपात्र होऊन नामुष्कीची वेळ ओढून आणू नये, त्यांनी राजीनामा द्यावा अशा शब्दांत रविकांत तुपकरांनीं प्रत्युत्तर दिले होते.
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकारांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान हल्लाबोल आंदोलन केले. आंदोलन करताना तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांनी अपात्र होऊन नामुष्कीची वेळ ओढून आणू नये. त्यांनी राजीनामा द्यावा. शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल, तर राजीनामा द्यावा आणि खुर्चीतून बाजूला व्हावे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला फसविण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करू नये, असे वक्तव्य केले होते.
तुपकर यांच्या या वक्तव्यावरून सत्ताधारी आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी नाव न घेता त्यांची पात्रता काढली आहे. 'जो कोणी असे बोलला असेल त्याने शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय काय केले, हे पाहून घ्यायला पाहिजे. आमच्याबद्दल बोलायचा अधिकार फक्त उद्धव साहेबांना आहे, बाकी कोणालाही नाही. मुख्यमंत्री कुठ, आमदार कुठे. कुठे काही पात्रता आहे का आपली बोलायची. कोणाबद्दल बोलता आपण...' अशा शब्दात आमदार संजय गायकवाड यांनी रविकांत तुपकरांना प्रत्युत्तर दिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गेल्या अनेक दिवसांपासून रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) हे कापूस आणि सोयाबीनच्या मुद्द्यावर आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केली. अटक बेकायदेशीर असल्याचे नमूद करीत न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. त्यानंतर तूपकर यांनी अन्नत्याग आंदोलन केले. अन्नत्याग आंदोलनादरम्यान मंत्रालयाकडे निघालेल्या तुपकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 29 नोव्हेंबरला त्यांना मुंबई चर्चेसाठी बोलावून घेतले.
काही दिवसातच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठकही झाली. बैठकीत जे विषय ठरले, त्यावर राज्य आणि केंद्र सरकारने अंमलबजावणी न केल्यामुळे तुपकर यांनी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरातील विधान भवनावर हल्लाबोल मोर्चा काढला.
या मोर्चातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे तुपकर वादात सापडले आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या टिकेनंतर तुपकर कोणती प्रतिक्रिया देतात व त्यातून बुलढाणा या एकाच गावात राहणाऱ्या दोन नेत्यांमधील हा विषय कुठपर्यंत जातो, हे लवकर स्पष्ट होईल.
(Edited By Deepak Kulkarni )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.