RPI News : लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने एकही मतदारसंघ दिला नाही. रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्ती केली होती. मात्र त्यांच्यासाठीसुद्धा मतदारसंघ सोडला नाही.
त्यामुळे आता रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी कमळाचे काम करायचे नाही हे ठरवले आहे. आता आठवले साहेबांनी महायुतीत राहायचे की नाही याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, असे सांगून रिपाइं (आठवले) गटाचे राष्ट्रीय संघटन सचिव भूपेश थुलकर यांनी अप्रत्यक्षपणे आपल्याच नेत्याला इशारा दिला आहे.
सुमारे दहा वर्षांपासून रिपाइं भाजपसोबत आहे. यंदाच्या लोकसभेत एकही उमेदवार दिला नाही. विधानसभेच्या निवडणुकीत काही जागा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र तीसुद्धा फोल ठरली आहे. मुंबईतील कलिनाची जागा आरपीआयला सोडण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले.
मात्र येथील उमेदवार अमरजित सिंग यांच्या हाती कमळ देण्यात आले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. ही धूळफेक असल्याचे थुलकर यांनी सांगितले. तसेच ही जागा रिपाइंने मागितलीच नव्हती, असा दावा देखील थुलकर यांनी केला.
काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत असताना आघाडीने चार जागा लोकसभेच्या दिल्या होत्या. विधान परिषदेचे पाच रिपाईच्या कार्यकर्त्यांना पाठवण्यात आले होते. महामंडळे दिली होती. महायुतीने अलीकडेच सात जणांना राज्यपालांच्या नियुक्तीने विधान परिषदेवर नियुक्त केले आहे. यात एकही रिपाइं कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला नाही.
भविष्यातही महायुतील रिपाइंच्या कार्यकर्त्यांना स्थान देईल याची कुठलीच शाश्वती आणि आशा दिसत नसल्याने आता रामदास आठवले यांनी यांनी रिपाई कार्यकर्त्यांच्या असंतोषाची दखल घ्यावी आणि रिपब्लिकन जनतेच्या मनातील निर्णय घ्यावा असे थुलकर यांनी आवाहन केले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत शिर्डी किंवा सोलापूर यापैकी एक जागा रिपाइंने मागितली होती. स्वत: रामदास आठवले यांनी यापैकी एका मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, भाजपच्या नेत्यांही इच्छा राखली नाही. दोन्ही मतदारसंघात भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. आमच्या प्रमुख नेत्यांचीच मागणी पूर्ण केली जात नाही तर इतरांना भाजप काही देईल याची कोणालाच शाश्वती नसल्याचे थुलकर यांनी स्पष्ट केले.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.