

Bachhu Kadu : सातत्याने शेतकऱ्यांच्या मुद्यांवर शासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडणाऱ्या माजी मंत्री बच्चू कडू यांची भाजपसोबत पुन्हा जवळीक वाढताना दिसत आहे. बच्चू कडू अध्यक्ष असलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्य शासनाने शेतकरी बांधवांना दिलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल आभार कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी बँकेच्या वतीने बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला.
बच्चू कडू यांची भाजपसोबत पुन्हा जवळीक?
बच्चू कडू हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजप-शिवसेना युतीत होते. पण लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यावरून त्यांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद झाले. त्या निवडणुकीत कडू यांनी काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांना मदत केली आणि राणांचा पराभव झाला. त्यानंतर भाजप आणि नवनीत राणा यांनी संपूर्ण ताकद लावून अचलपूर विधानसभा मतदारसंघात बच्चू कडू यांचा पराभव केला.
मागील दोन वर्षांपासून कडू हे सातत्याने भाजपवर आणि राज्य सरकारवर टीका करत राहिले. शेतकऱ्यांच्या मुद्यांवर शासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडत राहिले. मात्र नुकताच शासनाने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर कडू यांनी समाधान व्यक्त केले होते. आता बच्चू कडू आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या भेटीमागे दडलंय तरी काय? अशी चर्चा आता राजकीय व सहकार वर्तुळात आहे.
भोंदू खरातची भविष्यवाणी :
दुसऱ्या बाजूला बच्चू कडू यांचा काही दिवसांपूर्वी भोंदू बाबा अशोक खरात याचा आशीर्वाद घेताना एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात खरात बच्चू कडू यांना "तुम्ही भाजपमध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथे या" असा आशीर्वाद देताना दिसत आहे. त्याचवेळी कडू यांची पुन्हा भाजपसोबतची वाढती जवळीक पाहून भोंदू खरातची भविष्यवाणी खरी ठरणार का? असा प्रश्न आहे.
भेटीमागे कुठलाही राजकीय हेतु नाही :
बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी मात्र पालकमंत्र्यांच्या जिल्हा बँकेच्या भेटीमागे कुठलाही राजकीय हेतु किंवा राजकारण नाही, असे भेटीपूर्वी स्पष्ट केले होते. पालकमंत्री हे कुठल्याही एका पक्षाचे नसतात तर संपूर्ण जिल्ह्याचे पालकत्व त्यांच्याकडे असते. पालकमंत्र्याच्या भेटीदरम्यान आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच शेतकरी सभासदांच्या समस्या त्यांच्या समोर ठेवणार आहोत, तसेच बॅंकेच्या कारभारात काही उणीवा असेल तर त्या आम्ही स्वीकारणार आहोत. जिल्ह्यातील खासदारांसह सर्व आमदारांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.