नाना पटोलेंनी हमी घेतलेले भोयर यांची शांतता अन् राष्ट्रवादीचा संभ्रम...

काँग्रेसच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही निवडणूक भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंना (Chandrashekhar Bawankule) जात असल्याचे बोलले जात आहे.
Chotu Bhoyar and Nana Patole
Chotu Bhoyar and Nana PatoleSarkarnama

नागपूर : विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आणि कट्टर स्वयंसेवक डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर (Chotu Bhoyar) कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. बैठकीत खुद्द प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भोयर यांची हमी घेतली होती. अद्यापही भोयर यांच्या खेम्यात शांतता आहे. कॉंग्रेसने सहकारी पक्षांच्या नेत्याशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संभ्रमात आहेत. याचा फटका विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही निवडणूक भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंना (Chandrashekhar Bawankule) सोपी जात असल्याचे बोलले जात आहे.

विधान परिषदेसाठी काँग्रेसने रवींद्र भोयर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना भाजपचे दिग्गज उमेदवार माजी ऊर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत आहे. काँग्रेसने स्वयंसेवक व भाजपचे नगरसेवक असलेल्या भोयर यांनाच गळाला लावल्याने रंगतदार लढत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या बैठकीत भोयर यांची हमी घेतली होती. पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांची पहिली पसंती ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांना होती. मात्र, पटोले आपल्या मतावर ठाम राहिल्याने गुडधे यांनी उमेदवारी मागे घेतली. सध्या विधान परिषदेच्या आखाड्यात फक्त तीन उमेदवार आहेत.

महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजपकडे मताधिक्य अधिक आहे. असे असले तरी अंतर्गत असंतोषाचा फायदा काँग्रेसला उचलता येऊ शकतो. यापूर्वी राजेंद्र मुळक उमेदवार असताना भाजपकडे ४५ मतदार अधिक होते. यानंतरही चार मतांनी मुळक निवडून आले होते. भोयर अद्याप मतदारांपर्यंत पोहोचलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे २४ मतदार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करून आठवडा उलटून गेला आहे. मात्र, काँग्रेसच्यावतीने आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत पक्षस्तरावर साधी बैठक अद्याप झाली नाही. कुणी नेता याकरिता पुढाकार घेतानाही दिसत नाही. स्वतः उमेदवारांनी संपर्क साधला नसल्याने राष्ट्रवादीचे मतदारही नाराज आहेत.

Chotu Bhoyar and Nana Patole
नाना पटोले आणि डॉ. दंदेंनी पूर्ण केली इहलोकाच्या वाटेवरील लेखिकेची इच्छा...

नागपूर शहरात राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक दुनेश्वर पेठे आहे. ते राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत. ग्रामीणमध्ये २३ मतदार आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनीसुद्धा काँग्रेस तसेच उमेदवारानेसुद्धा आमच्यासोबत संपर्क साधला नसल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे आठ जिल्हा परिषद सदस्य आहेत. याशिवाय नरखेड, हिंगणा, वानाडोंगरी नगरपालिकांमध्ये सदस्य आहेत. एकूण संख्या २४ इतकी आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत ही संख्या निर्णायक मानली जाते. असे असतानाही राष्ट्रवादीसोबत काँग्रेसमार्फत समन्वय का साधला जात नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आमच्यासोबत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र भोयर वा काँग्रेसच्या एकाही नेत्याने अद्याप संपर्क साधला नाही. आघाडीचा धर्म म्हणून आम्ही काँग्रेससोबत आहोत. तशा सूचना पक्षश्रेष्ठींकडून आम्हाला आल्या आहेत. महाविकास आघाडी तयार करण्यात राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीच्या मतदारांना मानसन्मान देणे अपेक्षित आहे.

-बाबा गुजर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com