
Nagpur News : सध्या काँग्रेसच्या सद्भावनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ प्रथमच नागपूरला येत आहेत. या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीकडे लक्ष वेधून आपआपसांत सद्भावना कायम ठेवण्याचे आवाहन करणार आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे.
सपकाळांनी आपल्या जिल्ह्यात यात्रा काढली तरी तेवढे पुरे आहे, असे सांगून यात्रेची फारशी दखल घेण्याची गरज नसल्याचे बावनकुळे यांनी सूचित केले. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हटवले. त्यांच्याऐवजी बुलढाणा जिल्ह्यातील हर्षवर्धन सपकाळ यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
अहमदाबाद येथे काँग्रेसचे अधिवेशन पार पडले. त्यासोबतच सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक दिल्लीत घेऊन पक्षसंघटना नव्याने कशी बांधायची याविषयी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी सपकाळांनी सर्व जिल्हाध्यक्ष बदलण्याचे संकेत दिले आहेत. नवा अध्यक्ष व नवीन कार्यकारिणी तयार करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती, अध्यक्षांबाबत स्थानिक कार्यकर्त्यांचे मत ते जाणून घेत आहे.
याकरिता जिल्हानिहाय निरीक्षक नेमले आहेत. सर्वांना पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दहा ते बारा वर्षांपासून अध्यक्ष बदलले नाहीत. कार्यकारिणीसुद्धा कायम आहे. पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे.
नागपूर जिल्ह्यात तो प्रामुख्याने दिसून येतो. नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी केली होती. त्यांना निलंबित करण्यात आले आहे. यानंतरही पक्षातील काही नेते त्यांना काँग्रेसच्या बैठकीला बोलावत असल्याच्या तक्रारी आहे. सद्भवाना यात्रेनंतर नागपूर जिल्ह्यात काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा जनाधार अद्यापही मोठा आहे, हे दिसून आले. विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असे तीन दिग्गज नेते असतानाही भाजपला दोन विधानसभा मतदारसंघ गमवावे लागले.
आता नागपूर महापालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूकसुद्धा तोंडावर आहे. त्यामुळे प्रमुख विरोधक म्हणून भाजपचेही या यात्रेकडे लक्ष राहणार आहे. असे असले तरी पालकमंत्री बावनकुळे यांनी काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला गंभीर घेण्याची गरज नसल्याचे सांगितले. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आपल्या बुलढाणा जिल्ह्यात जरी यात्रा काढली तरी ते पुरे आहे, असे सांगून भाजपला काही फरक पडत नाही, असे सूचित केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.