Vidarbha Politics : लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयार सुरू केली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींची महाराष्ट्रावर विशेष नजर असून, 'मिशन ४५' निश्चित केले आहे. याचवेळी भाजपकडून काही विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्यात येणार अशी चर्चा असून, त्यांच्या जागी नवीन उमेदवार देण्याची शक्यता आहे. याचदरम्यान आता भाजपच्या एका खासदाराने मोठे विधान केलं आहे.
खासदार रामदास तडस यांनी वर्ध्याच्या पवनार येथे महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता सेवा अभियानांतर्गत स्वच्छता केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवर भाष्य केलं. तडस म्हणाले, मी भाजपचा सच्चा कार्यकर्ता असून, भाजपशी कायम एकनिष्ठ राहणार असल्याचं वक्तव्य वर्धाचे खासदार रामदास तडस यांनी केलंय. आम्ही कोणत्या पदासाठी काम करत नाही, तर पक्षासाठी काम करतोय, असंही त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भातील भंडारा-गोंदिया, चंद्रपूर-गडचिरोली, नागपूर व वर्धा या चार लोकसभा क्षेत्राचे जनसंपर्क अभियान संयोजक म्हणून खासदार रामदास तडस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, याचवेळी लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या जागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांना वर्ध्यातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
खासदार रामदास तडस म्हणाले, माझे तिकीट कापणार असल्याच्या बातम्यांचे आम्ही खंडन करत आहोत. एकतर आम्ही कधीच पदासाठी नाही तर कार्यकर्ता म्हणून भाजपमध्ये काम करतो आहे. कुणालाही तिकीट मिळालं तरी भाजपसोबत राहूनच काम करणार असल्याचेही तडस यांनी सांगितले.
तडस यांच्या पक्षप्रवेशानंतर वर्धा मतदारसंघात भाजपचं वर्चस्व
खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्याकडे वर्धा जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करणारे नेते म्हणून पाहिले जाते. 2009 पर्यंत वर्धा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. या मतदारसंघात 12 वेळा काँग्रेस तर एकदा कम्युनिस्ट पार्टीने बाजी मारली होती. भाजपला फक्त तीन वेळा या मतदारसंघात विजय मिळाला होता. मात्र, तडस यांच्या पक्षप्रवेशानंतर वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
काँग्रेसकडून तडस हे विधान परिषेदवर निवडूनही गेले होते. मात्र, 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपत प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना देवळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीही दिली होती. मात्र, त्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अखेर 2014 मध्ये मोदी लाटेमुळे रामदास तडस विजयी ठरले.
काँग्रेसच्या चारुलता टोकस यांनी 2019 मध्ये रामदास तडस यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले होते. तडस यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान मोदी यांनी, तर टोकस यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनीही वर्ध्यात प्रचार सभा केली होती. त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची झाली होती. अखेर या लढतीत रामदास तडस यांनी बाजी मारली होती.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.