

नागपूर : मी कालपासून नागपुरात आहे. कालपासून मी मोठमोठे उड्डाण पूल, रेल्वेचे पूल दिसत आहेत. तेव्हापासून मी बघतोय की, भाजपचे कुणी लोक भीक मागताना दिसतात का? आम्ही काय तर ईडीच्या रडारवर आहोत, कारण आमच्याकडे काय तर म्हणे खूप पैसे आहेत. मग तुमच्याकडे काय आहे, तुम्ही लोक काय भीक मागत आहात का, असा सवाल शिवसेना नेते खासदार राऊत यांनी केला.
या देशातील सर्व बिल्डर, उद्योगपती, हवालावाले, ब्लॅक मार्केटवाले त्यांचे देणगीदार आहेत. त्यांच्या पैशांवरती यांचे पक्ष तरारले आहेत. त्याच्याच बळावर हे सरकार आणतात आणि पाडतात, असा घणाघाती आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. हे सर्व जर केंद्रीय तपास यंत्रणांना दिसत नसेल, तर केवळ आश्चर्य व्यक्त करणे, येवढेच आपल्या हातात आहे, असेही ते म्हणाले. कुणी आरोप करेल, काहीही बडबड करेल, याला काही अर्थ आहे का? असा सवाल करीत पश्चिम बंगाल (West Bengal) आणि महाराष्ट्रासारख्या (Maharashtra) मोठ्या राज्यांमध्ये सरकार बनले नाही, त्यामुळे भाजपचे लोक दुःखी आहेत आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमचे सरकार (Mahavikas Aghadi Government) खेचण्याचे प्रयत्न ते करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून आम्हाला ते असा दाबण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्या लोकांनी ध्यानात ठेवावे. ते यशस्वी होणार नाहीत. त्यांना वाट्टेल ते करावे, पण आम्ही त्यांच्या दबावाला बळी पडणार नाही. न्यायालयेसुद्धा त्यांच्याच लोकांना दिलासा देतात. अन्यायाच्या विरोधात आमच्याही लोकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले, पण आमच्या लोकांना न्यायालयाने दिलासा दिला नाही. पण त्यांच्या लोकांना पटकन न्याय मिळतो. परमवीर सिंह यांचे उदाहरण यासाठी पुरेसे ठरेल, असे म्हणत यावरून काय लक्षात घ्यायचे ते घ्या, असे खासदार राऊत म्हणाले.
राज्यात सध्या २५ असे लोक आहेत, की ज्यांच्यावर राज्य सरकारला कारवाई करायची आहे. पण ती लोक न्यायालयात जाता आणि न्यायालय त्यांना दिलासा देतो. असा आमच्या लोकांना न्यायालयाने दिलासा दिला आहे का? असेल तर दाखवा, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. जितेंद्र दवलानी यांची चौकशी सुरू झाली आहे, याबाबत विचारले असता ते म्हणाले की, अशा लोकांवरती केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई करायला पाहिजे, ती त्यांनी केली नाही. त्यामुळे हे प्रकरण महाराष्ट्राकडे आले आहे. त्यांच्यावर कायद्याने कारवाई होईल, असे राऊत म्हणाले.
किरीट सोमय्या यांनी मुंबईत काल पत्रकार परिषदेत सांगितले की, महाविकास आघाडी सरकारमधील आणखी सहा मंत्री जेलमध्ये दिसतील. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना किरीट सोमय्या काय देशाचे न्यायमूर्ती आहेत का, असा संतप्त सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. जसे सिरीयल किलर असतात, सिरीयल रेपीस्ट असतात, तसे सिरियल तक्रारकर्ते असतात, असे ते सोमय्या नामोल्लेख टाळून म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.