
विधानसभा निवडणुकीनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप दोन गटात विभागली गेली आहे. यातील एक गट आहे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा आणि दुसरा आहे आमदार किशोर जोरगेवार यांचा. जोरगेवार यांनी मुनगंटीवार यांना बरेच धक्के दिले. यात त्यांना राज्यातील नेत्यांचीही साथ मिळाली.
नुकत्याच झालेल्या भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीतही या दोन्ही गटांमध्ये वर्चस्वाची लढाई बघायला मिळाली. मात्र वरिष्ठ नेत्यांनी दोघांनाही नाराज केले नाही. महानगर जिल्हाध्यक्षपदी जोरगेवार समर्थक सुभाष कासनगोट्टवार आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी मुनगंटीवार समर्थक हरीश शर्मा यांची निवड करण्यात आली.
पण आता याच हरीश शर्मा यांच्या खांद्यावर हात टाकत जोरगेवार यांनी मुनगंटीवार यांना आणखी एक धक्का देण्याची तयारी सुरु केली आहे. खरंतर शर्मा यांचे जोरगेवार यांच्यासोबत कौटुंबिक संबंध आहेत. मात्र ते उघडपणे दिसून येत नाही. अशात नुकताच नागपूरमध्ये भाजपचा एका कार्यक्रम पार पडला.
यात कार्यक्रमात किशोर जोरगेवार आणि हरीश शर्मा हे दोघेही एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसले. इतकंच नाही तर जोरगेवार यांनी शर्मा यांच्या खांद्यावर हातही ठेवला. त्यामुळे उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली. शर्मा यांनाही आपल्याकडे वळविण्याचा जोरगेवार यांचा प्रयत्न तर नाही ना, अशी कुजबुज सध्या चंद्रपूरमध्ये ऐकायला मिळत आहे.
आजवर चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवर यांचे वर्चस्व होते. कोणाला शहराध्यक्ष, महापालिकेत कोण उमेदवार असणार? नगपालिकेत कोण उमेदवार असणार? कोण महापौर आणि कोण नगराध्यक्ष असणार असे सगळे निर्णय मुनगंटीवारच घ्यायचे. त्यांचा शब्द भाजपात अंतिम मानला जात होता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे.
ज्या जोरगेवार यांना मुनगंटीवार यांनी भाजपमध्ये प्रवेश देण्यास विरोध केला होता तेच जोरगेवार विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने निवडून आले. आता जोरगेवारांचा जिल्ह्यात चांगलाच जोर वाढला आहे. जोरगेवार यांच्या मदतीला माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, आमदार बंटी भांगडिया, माजी मंत्री शोभाताई फडणवीस हेसुद्धा धावून आले.
यापूर्वी मुनगंटीवार यांनी सुचवलेल्या मंडळ अध्यक्षांच्या नावांना जोरगेवार यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे अगदीच किरकोळ समजल्या जाणाऱ्या मंडळ अध्यक्षांची निवडही प्रतिष्ठेची झाली होती. त्यापाठोपाठ शहर आणि ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी आपला पसंतीचा माणूस असावा, यासाठी दोघांनीही मोर्चेबांधणी केली होती.
राहुल पावडे यांची जिल्हाध्यक्षपदावरील नियुक्ती कायम रहावी यासाठी मुनगंटीवार आग्रही होते. तर आमदार जोरगेवार यांनी सुभाष कासमगुट्टवार, दशरथसिंग ठाकूर आणि डॉ. मंगेश गुलवाडे यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती. तर ग्रामीणसाठीही हरीश शर्मा यांची पुनर्नियुक्ती व्हावी यासाठी मुनगंटीवार यांनी ताकद पणाला लावली होती. पण इथेही ब्रह्मपुरीचे क्रिष्णा सहारे, विवेक बाढे, नामदेव डाहुले असे जोरगेवार समर्थक इच्छुक होते.
ही दोन्ही पदे हिसकावून आमदार मुनगंटीवारांचे आजवरचे संघटनेवरचे वर्चस्वच काढून घेण्याचा प्रयत्न जोरगेवार यांचा होता. पण भाजपअंतर्गत गटातटाचे राजकारण बघता आमदार मुनगंटीवार गटाला ग्रामीण आणि जोरगेवार यांच्या गटाला शहराचे जिल्हाध्यक्षपद देण्यात आले आहे. यात पहिल्यांदाच मुनगंटीवार गटाव्यतिरिक्त गटाकडे जिल्हाध्यक्षपद गेले आहे. हा मुनगंटीवार यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.