
Chandrashekhar Bawankule Questions MVA Leaders : जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेऊन मोदी सरकारने विरोधकांना गारद केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काँग्रेस इंडिया आघाडीच्या प्रचाराच्या प्रमुख मुद्याची हवाच काढून टाकली आहे. यावरून आता श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. राहुल गांधी यांनी यासाठी भाजपला भाग पाडले असल्याचा दावा केला जात आहे. याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनुकळे जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे इंडिया आघाडीचे नेते आता गप्प का बसले? अशी विचारणा केली.
शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल अभिनंदन करण्याचे औदार्य दाखवणार, की नाक मुरडत घाणेरडे राजकारण करणार? असा थेट सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीने जातनिहाय जनगणना आणि मोदी सरकार संविधान बदलणार या दोन मुद्द्यांवर सर्वाधिक फोकस केला होता. लोकसभेच्या निवडणुकीत याचा इंडिया आघाडीला चांगलाच फायदा झाल्याचे दिसूनही आले. त्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला फटका बसणार याची भीती वर्तविली जात होती. मात्र संविधान बदलणार हे फेक नॅरिटिव्ह असल्याचे लोकांपर्यंत पोहचवण्यात भाजप यशस्वी झाली. त्यामुळे महायुती फक्त पडझडच थांबली नाही, तर महायुती सत्तेतही आली.
त्यानंतर जातीनिहाय जनगणना हा मुद्दा काँग्रेस नेत्यांनी हाती घेतला होता. राहुल गांधी हे वारंवार जातनिहाय जनगणना करण्याची मागणी आपल्या भाषणातून करीत होते. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा यास विरोध आहे असाही आरोप केला जात होता. यात कोणाच्याही ध्यानमनी नसताना मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
त्यामुळे काँग्रेस नेत्यांची चांगलीच अडचण झाली. त्यांना याचे स्वागत करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. मात्र यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना या निर्णयास शंकेचीही जोड काँग्रेस नेत्यांनी दिली. त्यामुळे आता बावनकुळेंनी मोदी यांचे अभिनंदन करणार की नाही? अशी विचारणा करून काँग्रेस नेत्यांची कोंडी केली आहे.
आपल्या एक्स प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये विरोधकांवर टीका करताना बावनकुळे म्हणतात, ''केवळ आपल्या स्वार्थी राजकारणासाठी या नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षांनी जातीचे संकुचित राजकारण केले. पण या जातीतील नागरिकांना प्रगतीच्या, विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एवढ्या वर्षात या राजकीय पक्षांनी काहीच केले नाही. आता मोदीजी यांच्या सरकारने या जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून या देशातील सर्वच जाती प्रवाहांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संकल्प केला आहे. त्यांचे अभिनंदन करण्याऐवजी श्रेय लाटण्याचे काम केले जात आहे. यातून या विरोधी पक्षांची संकुचित मानसिकता देशाला पुन्हा एकदा दिसून आली आहे.''
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.