

Chandrapur District Politics : चिमूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा गड टिकवण्यासाठी मेहनत घेतलेले वारजुकर कुटुंब अखेर ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून भाजपाकडे वळले आहे. माजी महाराष्ट्र खनिकर्म विकास महामंडळ अध्यक्ष व माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. सतीश वारजुकर तसेच महाराष्ट्र युवा काँग्रेसचे महासचिव साईश वारजुकर यांनी गुरुवारी (26 फेब्रुवारी) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
चिमूर विधानसभा हा पूर्वी काँग्रेसचा मजबूत गड होता. नंतर अपक्ष डॉ. रमेशकुमार गजभे यांनी आमदारकी मिळवली. त्यानंतर डॉ. सतीश वारजुकर यांनी पुन्हा हा गड काँग्रेसकडे आणला. पुढे विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेतून उभे राहून या गडाला तडा दिला. काही वर्षांनी वडेट्टीवार यांनी शिवसेनेला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे वडेट्टीवार आणि वारजुकर कुटुंबात अस्तित्वाची लढाई सुरू झाली. या अंतर्गत संघर्षाचा फायदा घेत कीर्तिकुमार भांगडिया यांनी युवाशक्तीच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समितीत काँग्रेसला कमकुवत केले.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत वडेट्टीवार यांनी गटबाजीचे कारण देत चिमूर सोडून ब्रह्मपुरी मतदारसंघातून निवडणूक लढवली. वडेट्टीवार जरी दुसऱ्या क्षेत्रात गेले तरी गटतट कायम राहिल्याने त्याचा फायदा घेत किर्तिकुमार भांगडिया यांनी भाजपकडून निवडणूक लढवून माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर यांना पराभूत केले. त्यानंतरच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्येही काँग्रेसकडून उभे राहिलेले डॉ. सतीश वारजुकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.
प्रत्येक निवडणुकीत एकत्र येण्याचा देखावा दाखवला, तरी अंतर्गत संघर्ष थांबला नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर महानगरपालिका आदी ठिकाणीही गटबाजीमुळे काँग्रेसला फटका बसला. या सगळ्या अंतर्गत कलहाला कंटाळून वारजुकर कुटुंबाने भाजपकडे वळण्याचा निर्णय घेतला. आमदार किर्तिकुमार भांगडिया यांनी त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणली. आता त्यांच्या पक्षप्रवेशानंतर चिमूर मतदारसंघात खळबळ माजली असून काँग्रेसची संघटना आणखी कमकुवत होणार आहे.
या पक्षप्रवेशावर बोलताना डॉ. सतीश वारजुकर म्हणाले, गटबाजीमुळे काँग्रेसने मध्यवर्ती बँक, चंद्रपूर महानगरपालिका गमावली आणि आता जिल्हा परिषदही गमावण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सामान्य नागरिकांच्या विकासकामांसाठी विश्वासाने काम कसे होईल? त्यामुळे अंतर्गत गटबाजीला कंटाळून माझे भाऊ माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर, मुलगा साईश वारजुकर यांच्यासह मी भाजपा पक्षात प्रवेश केला आहे.
तर चिमूरचे काँग्रेस कार्यकर्ते जुनेद खान पठाण यांनी, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, चंद्रपूर. शंकरपूर ग्रामपंचायतीतील कोट्यवधी रुपयांच्या अनियमित कारभाराची चौकशी थांबावी आणि संभाव्य कारवाईपासून वाचण्यासाठी भीतीने वारजुकर कुटुंब भाजपात प्रवेश केला असल्याचा आरोप केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.