Chandrapur Political News : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस आणि भाजप आताच आमनेसामने आले आहेत. येथे वाढलेल्या राजकीय धामधुमीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसची जनसंवाद यात्रा आणि भाजपचे 'घर चलो आंदोलना'साठी पक्षाचे बडे नेते गावागावात फिरताना दिसत आहेत. या कार्यक्रमांतर्गत तालुक्यात दररोज बैठकांचा सिलसिला सुरू आहे. त्यामुळे आताच निवडणुका लागल्या की काय, असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करू लागले आहेत. (Latest Political News)
राजुरा विधानसभा क्षेत्र हा कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण शेतकरी संघटनेच्या अॅड. वामनराव चटप यांनी काँग्रेसवर विजय मिळविला. त्यांनी तीन वेळा या क्षेत्राचे प्रतिनीधीत्व केले. 2014 च्या निवडणुकीत मूळचे संघटनेचे पण भाजपत प्रवेश करित अॅड. संजय धोटे (Sanjay Dhote) यानी विधानसभा निवडणूक लढवून विजय मिळवला. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे सुभाष धोटे दोन हजार मतांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा आमदार झाले. त्यांनी शेतकरी संघटनेच्या वामनराव चटप यांचा पराभव केला होता.
सध्या राज्यात राजकीय गोंधळ सुरू आहे. त्यामुळे निवडणुका केव्हाही लागू शकतात, अशी शक्यता नेत्यांना आहे. यामुळे त्यांनी आतापासूनच वातावरण निर्मीती सुरू केली आहे. राज्यात काँग्रेसने जनसंवाद यात्रा काढली. राजुऱ्यात आमदार सुभाष धोटे, त्यांचे बंधू अरूण धोटे, पुतणे व नातेवाईकांनी पावसातही यात्रेचे नियोजन बदलले नाही. दुसरीकडे भाजपनेही राजुरा तालुक्यात 'घर चलो अभियान' राबविणे सुरू केले आहे. (Maharashtra Political News)
पंतप्रधान मोदींनी केलेला विकास गावागवात पोहचविण्याचे त्यांचे उद्दिष्ट्य आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर स्वत: अनेक गावात या अभियानासाठी फिरले. राजुरा विधानसभा प्रमुख म्हणून देवराव भोंगळे यांच्याकडे जबाबदारी आहे. तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही उपस्थिती लावली होती. काँग्रेसने आमदार सुभाष धोटे यांना जिल्हाध्यक्षपद देत बढती दिल्याने त्यांची उमेदवारी पक्की मानली जाते. पण भाजपकडून माजी आमदार अॅड. संजय धोटे, देवराव भोंगळे, माजी आमदार सुदर्शन निमकर हेही इच्छूक आहेत.
राष्ट्रवादीचीही तयारी
राजुरा विधानसभा क्षेत्र आपल्या वाट्याला यावे, यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी फिल्डींग लावली आहे. मुंबईत अजित पवार गटाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील नेत्यांनी भेट घेतली. तर नागपूरात शरद पवार गटाकडून रोहित पवार व रोहित पाटील यांनी बैठका घेतल्या. यावेळी दोन्ही गटातील चंद्रपूर जिल्ह्यातील नेत्यांनी राजूरा विधानसभा आपल्या वाट्याला घेण्याची मागणी केली.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.