
Nagpur, 06 February : मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीचा राजकीय ग्राफ सातत्याने खाली येत आहे. अंतर्गत लाथाळ्या, गटबाजी आणि एकमेकांच्या उंचलबांगडीने मोठा पक्षांतर्गत असंतोष वाढला आहे, त्यामुळे पक्ष सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. या सर्वांना कांशीराम यांच्या विचारावर चालणाऱ्या आझाद समाज पार्टीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) विधानसभेच्या निवडणुकीत नागपूरला येऊन गेले होते. तेव्हाच त्यांनी बसपासह रिपब्लिकन पक्षातील नाराज कार्यकर्त्यांना आपलेसे करणे सुरू केले होते. विधानसभेच्या निवडणुकीत आझाद पार्टीच्या एका उमेदवाराने अमरावती विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे उमेदवार व माजी मंत्री सुनील देशमुख यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना त्यांनी पछाडले होते.
आता आझाद पार्टीच्या वतीने दलित आणि मुस्लिमांची मोट बांधली जात आहे. बसपाचे अनेक नाराज कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात आहेत. बसपाने (BSP) पक्षातून निलंबित केलेले पूर्व विदर्भाचे इन्चार्ज रुपेश बागेश्वर यांना महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. त्यांच्यासोबत आतापर्यंत सुमारे पन्नास ते साठ बसपाच्या कार्यकर्त्यांनी आझाद पार्टीत प्रवेश केला आहे.
बागेश्वर इन्चार्ज असताना २०१७ च्या महापालिकेच्या निवडणुकीत बसपाचे १० नगरसेवक निवडून आले होते. सुमारे १३ उमेदवारांनी दुसऱ्या, तर १४ उमेदवारांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. या दरम्यान झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत बसपाचे उमेदवार निवडण्याची जबाबदारी बागेश्वर यांनी पार पाडली होती.
बागेश्वर यांनी नागपूरमधून लोकसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र, एका नवख्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याने बसपामध्ये मोठा असंतोष उफाळून आला होता. लोकसभेच्या उमेदवार निवडीसाठी आलेल्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावरून एकमेकांवर आरोप केले जात होते. त्यामुळे बागेश्वर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता बागेश्वर यांना आझाद पार्टीने सोबत घेऊन महाराष्ट्रात पक्षाची बांधणी करण्याची जबाबदारी सोपवली आहे.
आतापर्यंत बसपाचे अनेक मोठमोठे पदाधिकारी पक्ष सोडून गेले आहेत. विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक लढलेले एकही उमेदवार काही अपवाद वगळता नंतर पक्षात टिकला नाही. काही पदाधिकाऱ्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. मात्र तो महाराष्ट्राच्या राजकारण तग धरू शकला नाही. आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद खासदार आहेत. उत्तर प्रदेशात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.