

Akola Political News: राज्याच्या राजकारणात पावसाळी विधिमंडळ अधिवेशनापूर्वी मोठे राजकीय स्फोट होण्याचे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ सुरू झाल्याची जोरदार चर्चा रंगली असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चर्चांना आता अकोला जिल्ह्यातील एका मोठ्या राजकीय घडामोडीने आणखी हवा मिळाली आहे.
अकोला (Akola) जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपंचायतीमधील तब्बल 10 नगरसेवकांना आपल्या गोटात घेत, एकनाथ शिंदे यांनी राज्यभर चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ची पहिली झलक दाखवून दिल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या नगरसेवकांमध्ये काँग्रेस, अजित पवार राष्ट्रवादी पक्ष आणि अपक्ष गटातील सदस्यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे चार, अजित पवार राष्ट्रवादीचे दोन आणि चार अपक्ष, असे एकूण 10 नगरसेवकांनी मुंबईत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे यांच्या पुढाकारातून पार पडला.
या राजकीय घडामोडीनंतर बार्शीटाकळी नगरपंचायतीत सत्तांतराच्या चर्चांनी वेग घेतला आहे. इतकेच नाही, तर अकोट नगरपालिकेतील 15 हून अधिक नगरसेवकही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे राजकीय धक्के बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये अपक्ष गटातील शुभम इंगळे, नवेद खान, इफ्तेखारुद्दीन काझी आणि शहाना अंजुम यांचा समावेश आहे. तसेच काँग्रेसच्या रफिया खान, मुमताज सिद्दीक, सय्यद जहागीर, आसगिरी अंजुम आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीतील रुबिना परवीन व सफिया बेगम यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
दरम्यान, राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे पक्षातील काही खासदार आणि आमदार हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राजकीय चर्चांनुसार ठाकरे गटातील तब्बल 5 खासदार आणि 16 आमदार हे ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात, असा दावा केला जात आहे. अकोल्यातील ही घडामोड म्हणजे त्या मोठ्या राजकीय रणनीतीची केवळ सुरुवात असल्याचे बोलले जात असून, येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.