Amravati News, 11 August : मनोज जरांगे पाटील स्वत: मुख्यमंत्री झाले तरीही सग्यासोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे कोणीही तशी वल्गना करु नये, असं म्हणत भाजप नेते अनिल बोंडे यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला आहे.
राज्यात सध्या मराठा-ओबीसी आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. एकीकडे काहीही झालं तरी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देणारच आणि ते घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी ठाम भूमिका मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी घेतली आहे.
तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावं, अशी भूमिका घेतली आहे. यावरुनच राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. शिवाय मनोज जरांगे हे सतत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत तेच मराठ्यांमध्ये फूट पाडत असल्याचं वक्तव्य करत असतात. त्यामुळे काही भाजपनेते जरांगेंविरोधात उघड भूमिका घेताना दिसतात.
अशातच आता अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटलांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ते भाजप ओबीसी मोर्चाच्या बैठकीसाठी अमरावतीत आले होते. यावेळी बोलताना त्यांनी जरांगेंची सगेसोयऱ्याची मागणी पूर्ण होणार नसल्याचं वक्तव्य केलं आहे.
बोंडे म्हणाले, "रक्ताची नातं असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश होईल. पण सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही. मनोज जरांगे पाटील यांनी इलेक्शन लढवून ते स्वत: मुख्यमंत्री झाले तरीही ते ही गोष्ट साध्य करू शकत नाहीत. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान सर्वश्रेष्ठ आहे.
संविधानाचे रक्षण करण्यासाठी घटनात्मक संस्था देशात आहेत. त्यामुळे कोणीही तशा वल्गना करू नये, समाजा-समाजात फूट पाडू नये." असं म्हणत बोंडे यांनी जरांगे यांना डिवचलं आहे. त्यामुळे आता या वक्तव्यावर जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
गिरीश महाजन धनंजय मुंडे कसे निवडून येतात ते बघतोच असं म्हणत जरांगे यांनी या नेत्यांना थेट आव्हान दिलं आहे. परळी आणि महाजनांच्या मतदारसंघातील मराठा मतदारांची आकडेवारी जाहीर करत ते या निवडणुकीत कसे विजयी होतात तेच बघतो, असं चॅलेंज जरांगे यांनी दिलं आहे. त्यांनी भाजपविरोधात याआधीही अनेकवेळा उघड भूमिका घेतली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी 12 महिने झाले आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. पण आमचे शांततेत सुरू असलेले आंदोलन सरकारला कळत नसेल तर आमचा नाइलाज आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. यामुळे निवडणूक लढवायची वेळ आली तर पक्ष काढणार नाही, मात्र अपक्ष उमेदवार उभे करणार.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.