

Akola Political Crime News : अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपरिषदेच्या सभेत चित्रीकरण करण्याच्या कारणावरून सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत तुफान हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेत काही जखमी झाले असून, भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत. यावरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, यात नगराध्यक्षांच्या पती व दोन्ही मुलांचा समावेश आहे. तर राजकीय वादातून झालेल्या या मारहाणीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपरिषदेत २७ नोव्हेंबर रोजी सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रम पत्रिकेसोबत विषयांची सविस्तर टिपणी न दिल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादावरून सत्ताधारी भाजप-भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आमनेसामने आले आणि जोरदार वाद झाला. पाहता पाहता भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे नगरसेवक एकमेकांना भिडले आणि त्यांच्यात तुफान हाणामारी झाली. तर या वादाचे पर्यवसान नंतर नगरपरिषदेसमोर हाणामारीत झाले.
या मारहाणीत शिवसेनेचे नगरसेवक तथा गटनेते रवी घुंगड आणि नगरसेवक ऋषी पंचबुद्धे यांच्यासह काही जण जखमी झाले आहेत. तर ही मारहाण भाजपच्या नगराध्यक्षांच्या नातेवाईकांनी केल्याचा दावा केला जात आहे. घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
ज्यानंतर भाजपने देखील यावरून तक्रार दाखल करत बांधकाम सभापती अजित खान जमीर खान यांना मारहाण झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणामुळे हिवरखेडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आता दोन्ही बाजूंनी परस्पर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
आता CCTV फुटेज तपासल्यानंतरच नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता असून, पोलीस व नगरपरिषद प्रशासनाकडून CCTV फुटेज हस्तगत करण्यात आले आहे. पण हे करत असताना संपूर्ण हिवरखेड नगरपरिषद सील करण्यात आली होती. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून नगरपरिषद परिसरात दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, नगरपरिषदेत भाजपची एकहाती सत्ता असून, दादागिरी केली जात असून विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते रवी राणा घुंगड यांनी केला आहे. तर परवानगी न घेता ऋषिकेश पंचबुद्धे यांनी जाणीवपूर्वक चित्रीकरण सुरू केले. मनाई केल्यानंतरही त्यांनी चित्रीकरण सुरूच ठेवल्याने वाद झाल्याचे नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुलभा दुतोंडे यांनी सांगितले आहे.
या राड्यानंतर दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या आहेत. यावरून पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून, यात भाजपच्या नगराध्यक्ष सुलभा दुतोंडे यांचे पती रमेश दुतोंडे व त्यांच्या दोन मुलांसह एकूण नऊ जणांचा समावेश आहे. तर भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण असून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या हिवरखेडमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.