Akola News, 18 June : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्या या कृतीमुळे ते चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
शिवाय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांच्यावर अनेक नेत्यांनी आक्षेप घेत जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. या सर्व प्रकरणावर आता पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी शेतकरी आहे. त्यामुळे मला या चिखलाची सवय आहे, या चिखलाचा मला काहीही फरक पडत नसल्याचं पटोलेंनी म्हटलं.
कार्यकर्त्याने पाय धुतल्याच्या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना पटोले (Nana Patole) म्हणाले, अकोला येथील घटना लपून राहिलेली नाही. माझ्या कार्यकर्त्याने पायावर पाणी टाकले कारण तिथे नळ उपलब्ध नव्हता, म्हणून त्याने पायावर बॉटलमधील पाणी टाकले. मी शेतकरी आहे. त्यामुळे मला या चिखलाची सवय आहे.
चिखलामुळे मी गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन करणार नाही, असा कुठलाही प्रकार नव्हता. तसंच चिखलाचा मला काहीही फरक पडत नाही. मी काही राजा नाही, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही. मी शिवरायांचा मावळा आहे आणि मी कायम मावळ्याप्रमाणेच राहील, अशा शब्दात पटोले यांनी सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं.
काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोमवारी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी वाडेगावात मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी ते गेले. यावेळी पालखी दर्शनासाठी थांबलेल्या विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे खूप चिखल झाला होता.
याच चिखलातून मार्ग काढत त्यांनी संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर ते गाडीजवळ आल्यानंतर त्यांनी चिखलाने माखलेले आपले पाय चक्क एका कार्यकर्त्यानं धुवून घेतले. त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तर पटोले यांचे पाय धुणारा कार्यकर्ता सध्या नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे.
याच सर्व प्रकरणावरुन विरोधकांनी पटोलेंवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. अशातच पटोले यांनी स्वतःला संत आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये, अशा शब्दात अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पटोले यांचा समाचार घेतला. मिटकरी म्हणाले, "नेते अशाच प्रकारे कार्यकर्त्यांना वापरून पाय धुवायला लावत असतील तर हे कृत्य निंदाजनक आहे, यातून पक्षाची कार्यकर्त्याप्रती काय धारना आहे, हे या माध्यमातून दिसून येते.
पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हा पहिल्यांदाच प्रकार पाहण्यात आला आहे. हा अतिशय संतापजनक प्रकार असून नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुऊन घेणे, हा कार्यकर्त्यांचा एकप्रकारे अपमान आहे. नाना पटोलेंनी स्वतः ला संत आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये." दरम्यान, या प्रकरणाचा व्हीडीओ व्हायरला होताच भाजपच्यावतीने पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी मागणी केली जात आहे. त्यामुळे नानांनी स्पष्टीकरणं दिलं असलं तरी त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.