अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे भाजपची 'ब्रँड व्हॅल्यू' कमी झाली, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'ऑर्गनायझर' या मुखपत्रातील लेखात करण्यात आली होता. त्यावरून महायुतीत वादविवाद सुरू झाले.
याची धूळ खाली बसते न बसते तोच अजितदादांबद्दल ( Ajit Pawar ) पुन्हा एक नवा वाद सुरू झाला आहे. महायुतीत तिसऱ्या पक्षाची म्हणजे, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची गरज नाही, असा सूर भाजप आणि शिवसेनेच्या एका गटाकडून आळवला जात आहे. त्यामुळे महायुतीत अजितदादांच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
अजितदादांना महायुतीत ठेवण्याबाबत फेरविचार करावा, अशी मागणी भाजप आणि शिंदे गटातील काही नेत्यांकडून पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे, असे सांगितले जात आहे. माढा, दिंडोरी, सोलापूर आदी अजितदादांचे आमदार असलेल्या मतदारसंघांत भाजपच्या ( bjp ) उमेदवारांचा पराभव झाला. या मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसची मते भाजपकडे 'ट्रान्स्फर' झाली नाहीत, असे या नेत्यांचे म्हणणे आहे.
शिंदे गटाला अजितदादा पवार महायुतीत नको होते, याचे संकेत याआधाही मिळाले होते. पालकमंत्रीपदांच्या वाटपात अजितदादांचा वरचष्मा दिसून आला होता. खरेतर त्यावेळपासूनच त्यांच्याविषयी शिंदे गटात नाराजी निर्माण झाली होती. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी केलेला आकांडतांडवही सर्वांच्या लक्षात आहे.
महाराष्ट्रातील पराभवाची खरी कारणे समजून घ्यायची नाहीत, असे महायुतीतील पक्षांनी ठरवल्याचे दिसत आहे. यात भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे अपयशाचे खापर एकमेकांवर फोडले जात आहे. दिंडोरी मतदारसंघात भाजपचा पराभव होणारच होता, हे कुणीही सांगू शकले असते, मात्र ते लक्षात घेण्याची भाजपची अजूनही तयारी दिसत नाही. दिंडोरी मतदारसंघाच 80 टक्के क्षेत्रावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यामुळे या मतदारसंघातील शेतकरी देशोधडीला लागले. त्याचा फटका भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना बसणारच होता आणि तो बसला. पण, भाजप हे लक्षात घ्यायला तयार नाही. खरे कारण समजून घेऊन उपाययोजना करण्याऐवजी मित्रपक्षांवर खापर फोडण्याचे राजकारण सुरू झाले आहे.
माढा मतदारसंघातही भाजप उमेदवाराचा पराभव होणार होता. त्याला शरद पवार यांचे डावपेच कारणीभूत ठरले. शरद पवार संपले, अशी हाकाटी पिटणाऱ्या भाजप नेत्यांनी त्यांच्या डावपेचांना हलक्यात घेतले. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या ताकदीकडे भाजपच्या अहंकारी नेत्यांनी दुर्लक्ष केले. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उमेदवारीची मागितली होती. त्याकडे गांभीर्याने न पाहता भाजपचे उमेदवार, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे काम देशातील पहिल्या दहा खासदारांमध्ये, अशी वल्गना भाजपचे प्रदेशाध्यक्ष यापेक्षा अधिक एखाद्या नेत्याचे संपर्कप्रमुख असल्याच्या आविर्भावात काम करणारे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आणि विजय खेचून आणला.
सोलापूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी सातत्याने अपरिक्वतेचे प्रदर्शन केले. गेल्या दोन निवडणुकांत मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना विजयी केले होते. मात्र, मतदारांच्या पदरी निराशाच पडली. दोन्ही खासदारांनी भ्रमनिरास केला होता. त्यामुळे भाजपची अवस्था बिकटच होती. या निवडणुकीत भाजपने स्थानिक उमेदवार न देता विजयसिंह मोहिते पाटील यांच्या ताकदीमुळे माळशिरसचे आमदार झालेल्या सातपुते यांना उमेदवारी दिली. बाहेरचा उमेदवार देणे भाजपच्या अंगलट आले. सातपुते यांनी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न अनेकदा केला. त्याचाही फटका भाजपला बसला. सोलापूर उत्तर आणि दक्षिण मतदारसंघांत भाजपचेच आमदार आहेत, मात्र दोघांची तोंडे नेहमीच वेगवेगळ्या दिशांना असतात. या सर्व बाबींचा परिणाम होऊन काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी झाल्या.
वरच्या या तिन्ही मतदारसंघांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा झाल्या होत्या. त्यांच्या सभाही उमेदवारांना विजयी करू शकल्या नाहीत. खरेतर हे अपयश भाजपचे आहे. माढा, सोलापूरमध्ये उमेदवार देताना भाजपकडून मोठ्या चुका झाल्या. दिंडोरीत कांद्याचा प्रश्न ज्वलंत होता. महाराष्ट्रातील 10 ते 11 मतदारसंघांत कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यात दिंडोरीसह माढा आणि सोलापूरचाही समावेश होतो. कांदा निर्यातबंदीचा शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांकडे भाजपने अत्यंत निष्काळजीपणे पाहिले. त्यामुळे मोदींच्या सभाही निष्प्रभ ठरल्या. मोदींनी महाराष्ट्रात 18 जाहीर सभा आणि एक रोडशो घेतला होता. यापैकी 14 ठिकाणी भाजप किंवा महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. यासाठी अजितदादांना कसे जबाबदार ठरवता येईल?
लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालेले नाही. '400 पार'चा नारा देणाऱ्या भाजपचा वारू मतदारांनी '240' वर रोखला. उत्तर प्रदेशातही भाजपच्या जागा निम्म्याने कमी झाल्या. मग तेथे अजितदादा पवार होते का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी याआधीच उपस्थित केला आहे. सोलापूरलगतच्या उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघात अजितदादांच्या पक्षाच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचा पराभव झाला. या मतदारसंघात महायुतीचे पाच आमदार आहेत. त्यात भाजपचे तीन आणि शिंदे गटाचे दोन आमदार आहेत. या सर्वांच्या मतदारसंघातून अर्चनाताई पाटील पिछाडीवर राहिल्या.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातून आर्चनाताई सर्वाधिक 81 हजार मतांनी, तर पती, भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मतदारसंघातून त्या 60 हजार मतांनी पिछाडीवर राहिल्या. याची जबाबदारी भाजप, शिंदे गट कोणावर ढकलणार आहे? कांदा निर्यातबंदी, महागाई, बेरोजगारी, ध्रुवीकरणाचा प्रयत्न, पक्षांची फोडाफोडी यामुळे भाजपची पीछेहाट झाली, खापर मात्र अजितदादा यांच्यावर फोडले जात आहे.
एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यात सुरुवातीपासूनच सुप्त संघर्ष दिसून येत आहे. एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे नेते आहेत, असे केंद्रातील नेत्यांकडे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासमोर 'प्रोजेक्ट' करण्यात आले होते. अजितदादांच्या 'एन्ट्री'मुळे त्याला तडा जाईल, अशी भीती शिंदेंच्या मनात निर्माण झाली होती. शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी अजितदादांच्या विरोधात मोहीम उघडली होती. पक्षश्रेष्ठींच्या मर्जीशिवाय त्यांनी ती मोहीम उघडली होती, असे म्हणता येणार नाही. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आले आणि हा वाद पुन्हा उफाळून आला. भाजपचा पराभव का झाला, याची कारणे जगजाहीर असताना त्याचे खापर एकमेकांवर, विशेषतः अजितदादा पवार यांच्यावर फोडण्याचे उद्योग महायुतीत सुरू झाले आहेत. याद्वारे अजितदादांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.