Mahaviksa Agahdi Politics in Bhandra : भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार आयात केल्याने महाविकास आघाडीमध्ये मोठा असंतोष निर्माण झाल्याचे दिसत आहे. माजी आमदार चरण वाघमारे यांना आमच्यावर लादल्यास आघाडीचे काम करणार नाही असा इशाराही आज मेळावा घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी - शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी - शरदचंद्र पवारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
तुमसर विधानसभा मतदारसंघातून दरवेळी नवा आमदार विधानसभेत पाठवला जातो. 1962 पासून ही परंपरा सुरू आहे. यास फक्त सुभाष कारेमोरे हे एकमेव आमदार अपवाद राहिले. ते एकदा काँग्रेस आणि दुसऱ्यांदा अपक्ष निवडून आले होते. मात्र त्यांनाही मतदारांनी पाच वर्ष ब्रेक दिला होता.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजू कारेमोरे हे तुमसरचे आमदार आहेत. ते अजित पवार(Ajit Pawar) यांच्या पक्षात सहभागी झाले आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा समाना होणार आहे हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
2019च्या निवडणुकीत कारेमोरे यांनी चरण वाघमारे यांना पराभूत केले होते. 2014मध्ये चरण वाघमारे भाजपचे आमदार होते. मात्र भाजप(BJP) नेत्यांसोबत त्यांचे बिनसले. यातून त्यांचे तिकीट कापण्यात आले. त्यामुळे वाघमारे यांनी बंडखोरी केली होती. सुमारे 79 हजार मते घेऊन ते विजयाच्या समीप पोहचले होते. मात्र विजयाला त्यांना फक्त आठ हजार मते कमी पडली. त्यावेळी भाजपचे उमेदवार प्रदीप पडोळे 33 हजार मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होते.
निवडणुकीच्या निकालानंतर चरण वाघमारे यांना परत भाजपात आणण्यात वाटाघाटी झाल्या होत्या. मात्र त्या फिस्कटल्या आणि त्यानंतर वाघमारे यांनी केसीआर यांच्या भारत राष्ट्र निर्माण पार्टीचा झेंडा हाती घेतला होता. मात्र तेलंगणात पराभूत झाल्याने केसीआर यांनी महाराष्ट्रातून काढता पाय घेतला. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने चरण वाघमारे यांच्या उमेदवारीच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. शरद पवार(Sharad Pawar) यांनी त्यांना पक्षात घेतले आहे. त्यांची उमेदवारीसुद्धा निश्चित मानली जात असली, तरी आघाडीच्या स्थानिकांचा त्यांच्या नावाला कडाडून विरोध सुरू आहे.
मंगळवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात माजी आमदार सेवक वाघाये, मधुकर कुकडे, शिशुपाल पटले यांच्यासह किरण अतकरी, रमेश पारधी, कलाम शेख, नरेश ईश्वरकर, राजेश हटवार, देवा इलमे, प्रमोद तितरमारे आदी उपस्थित होते. सुमारे चार हजार आघाडीचे कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी झाले होते. मेळाव्याला उपस्थित नेत्यांनी वाघमारे यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध दर्शवला आहे. आम्ही आघाडीचे काम करणार नाही असाही इशारा दिल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार पक्ष आणि चरण वाघमारे यांचेही टेन्शन वाढले आहे.
(Edited by -Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.