Ramdas Athawale on Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीचं जागा वाटप कधीही जाहीर होवू शकतं. तर भाजपने 99 उमेवदारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. याशिवाय, प्रत्येक पक्ष आता हळूहळू त्यांच्या हक्काच्या जागांवरील उमेदवारांना ए बी फॉर्म वितरीत करत आहे. दरम्यान महायुतीमधील एक घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए) पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीबाबत एक विधान केलं आहे.
रामदास आठवले(Ramdas Athawale) यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. तर याचबरोबर महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची गरजच नाही, कारण ते सत्तेत येणारच नाहीत. जर सत्ताच मिळणार नसेल तर मुख्यमंत्रिदावरून भांडण करण्याची आवश्यकताच नाही.' असं म्हणत टोलाही लगावला आहे.
याशिवाय, रामदास आठवले यांनी जागा वाटपाबाबत बोलताना सांगितले की, त्यांच्या पक्षाला 5-6 जागा मिळायला हव्यात. तसेच त्यांनी विश्वासही व्यक्त केला की, आरपीआय(ए) पक्षाला किती जागा मिळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
केंद्रीयमंत्री आठवलेंनी सांगितले की, आमच्या महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत अशी कोणतीच चर्चा नाही. जेव्हा आम्हाला बहुमत मिळेल, तेव्हा आम्ही सगळे मिळून ठरवू. महायुतीला 170 पर्यंत जागा मिळू शकतात. स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आम्ही सगळे मिळून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करू. आम्हाला खात्री आहे की, कोणीही असला तरी तो आमचाच मुख्यमंत्री असेल.
मुंबईत मीडियाशी बोलताना केंद्रीयमंत्री आठवले म्हणाले, आम्ही 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही महायुतीला सत्तेत आणू इच्छित आहोत. यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए)ने आणखी जागा मागितल्या आहेत, आम्हाला पाच-सहा जागा मिळाल्या पाहिजेत..
आठवले पुढे म्हणाले, आम्ही याबाबत उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले आहे. जेव्हा महायुतीचं सरकार बनेल तेव्हा आमच्या पक्षाला एक मंत्रिपद आणि एक एमएलसी मिळाली पाहिजे. जिल्हा पंचायत आणि महानगरपालिकेत जागा मिळाली पाहीजे. आखणी काही आमच्या मागण्या आहेत, ज्या पूर्ण केल्या पाहिजेत, याबाबतही चर्चा झाली आहे.
याचबरोबर आठवले म्हणाले, मी अजिदादांसोबत फोनवर चर्चा केली आहे. त्यांनी मला सांगितले की एकट्याची भेट घेवून काही फायदा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची मिटींग होते, त्यात तुम्ही या. यामध्ये जागांवर चर्चा होवू शकते. त्यामध्ये काहीना काही मार्ग निघू शकतो. मी सध्या मुख्यमंत्र्यांशी बोलत आहे आणि लवकरच आम्हाला समजेल की आरपीआय(ए)ला कोणत्या आणि किती जागा मिळणार आहेत.''
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.