Nagpur News: राज्यात सध्या विविध प्रवर्गातील आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मराठा, ओबीसी, धनगर समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभर आंदोलन करत आहे. नागपूरमध्येही ओबीसी समाजाचे राज्यव्यापी आंदोलन सध्या सुरू आहे. या ओबीसी समाजाच्या आंदोलनाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी येथे अनेक राजकीय नेते सरसावले आहेत. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी नागपुरात येऊनही या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे.
मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. यासाठी कमलनाथ यांच्या निमंत्रणावरून आदित्य ठाकरे मध्य प्रदेशकडे रवाना झाले होते. त्याआधी ते उपराजधानी नागपुरात दाखल झाले होते. विमानतळावर ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यापुढे जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
जालन्यातील लाठीचार्जनंतर राज्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन चांगलेच पेटले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे न चुकता आंदोलकांच्या भेटीला गेले; पण दुसरीकडे त्यांचेच सुपुत्र आदित्य ठाकरे हे नागपुरात येऊनदेखील ओबीसी आंदोलनस्थळी न गेल्याने आता उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.
राज्य सरकार मराठा, ओबीसी आणि धनगर समाजावर अन्याय करत असल्याची टीका प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी केली. पण याच वेळी नागपुरात ओबीसींचे आंदोलन सुरू आहे, तेथे भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहात का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता, त्यांनी यावर उत्तर देणे पद्धतशीरपणे टाळले.
यासंदर्भात 'सरकारनामा'ने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी आमदार आदित्य ठाकरे आंदोलनस्थळीही आले नाहीत किंवा त्यांनी आमच्या कुठल्या नेते, पदाधिकाऱ्यांशीदेखील संवाद साधला नाही, असे स्पष्ट केले. यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांशीही संवाद साधल्यानंतर आदित्य ठाकरे आंदोलनस्थळी गेले नसल्याचे स्पष्ट झाले.
नागपूरपासून जवळच असलेल्या पांढुर्णा येथे भेट देत आदित्य ठाकरे यांनी एका सभेलाही संबोधित केलं. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास ते चार्टर विमानाने मुंबईकडे रवाना झाले. या संपूर्ण दौऱ्यात आदित्य ठाकरे यांना ओबीसी समाजासाठी एक मिनीटही सापडू नये, याबद्दल ओबीसी आंदोलनस्थळी चांगलीच चर्चा रंगली.
ठाकरे पिता-पुत्र कुणालाही भेटत नाहीत, 'मातोश्री'ला कुणाचेच काही देणेघेणे नाही, तेथे अपमानास्पदच वागणूक मिळते, असा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार फुटले होते. त्यानंतर ठाकरेंनी 'डॅमेज कंट्रोल'साठी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली.
वेगवेगळ्या समाजात जाऊन ठाकरे आपली विस्कटलेली 'वज्रमूठ' पुन्हा आवळण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशातच आपल्या पक्षातही मोठ्या प्रमाणावर ओबीसी तरुण आहेत, त्यांना काय वाटेल, हे नागपूर दौऱ्यात आदित्य ठाकरे कसे काय विसरले ? की त्यांना खरोखर या मुद्द्यांचे काही देणेघेणे नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगली आहे.
Edited by - Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.