

छत्रपती संभाजीनगरमधील हिंसाचारानंतर राजकीय चिखलफेक सध्या सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहे. मात्र, याचदरम्यान, भाजप राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी धक्कादायक विधान केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरात झालेल्या हिंसाचाराला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याची फूस होती असा दावा बोंडे यांनी केला आहे.
अनिल बोंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. बोंडे म्हणाले, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामांतर केल्यानंतर शहरात अशांततेचं वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या दंगलीतील प्रमुख आरोपी, रियाजुद्दीन आणि मौलाना कादीर यांचे फोन कॉल्स तपासले पाहिजेत. कुठल्या राष्ट्रवादीच्या नेत्याची त्यांना फूस होती हे तपासलं पाहिजे असंही अनिल बोंडे( Anil Bonde) म्हणाले आहेत.
या दंगलीमागं मोठ्या नेत्याचा हात...
राष्ट्रवादीच्या अब्दूल कादीरला निवडणूक लढवायची आहे. त्याचा मुलगा रियाजुद्धीन नेमका त्याच दिवशी भांडण करतो, त्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांना मारहाण होते, जलील मंदिरात आसऱ्याला जातात, तिथे तेलाचे डबे असतात, मग तिथे जाळपोळ सुरू होते. हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) नेत्याचं (अब्दूल कादीर) आणि त्याचा मुलगा रियाजुद्दीनचं कारस्थान आहे. परंतू, या कारस्थानामागे कोणीतरी मोठ्या नेत्याचा हात आहे.
राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होता. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी अलिकडेच म्हटलं होतं की, महाराष्ट्रात यापुढे दंगली पेटतील. संजय राऊतांचं बोलणं खरं सिद्ध करण्यासाठीच हा सर्व प्रकार घडवून आणला असंही बोंडे यावेळी म्हणाले.
एकीकडे हा सर्व दंगलीचा प्रकार होतो, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणतात, की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. हे एवढं बोलण्यासाठी यांना दंगल भडकवावी लागते असा आरोपही बोंडे यांनी यावेळी केला.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?
सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली होती. महाराष्ट्रात दंगली होणं ही खूप गंभीर बाब आहे. देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रालयाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. राज्यातल्या दंगली आणि संजय राऊतांच्या धमकी प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातलं पाहिजे. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी देखील बोलणार आहे, असं त्या म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.