
BJP News : सातत्याने निवडणुकीचा विचार करणारा आणि त्याचदृष्टीने तयारी करणारा पक्ष म्हणून भाजपला ओळखले जाते. निवडणूक अगदी ग्रामपंचायतीची असो की लोकसभेची, ती गांभीर्यानेच घेतली जाते. याशिवाय भाजपचा संघटन मजबूत करण्यावर भर असतो. याच्या अगदी उलट काँग्रेसचे चित्र दिसून येते. निवडणूक अगदी काठावर येऊन ठेपली तरी पक्षातील नेते निवांत असतात. नागपूरमध्ये याचे उत्तम उदाहरण बघायला मिळते.
नागपूर जिल्ह्यातील आज घडीची सगळी परिस्थिती भाजपच्या बाजूने आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे आहेत. जिल्ह्यात बहुतांश आमदार आणि शहराचे खासदार भाजपचे आहेत. तरीही भाजपने आळस न करता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी केली आहे.
मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या करत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संघटनेत सामावून घेतले. पाठोपाठ दोन जिल्हाध्यक्ष करत सर्वांनाच धक्का दिला. यातून एकावरच भार येणार नाही याचीही काळजी घेतली. दुसरीकडे काँग्रेसला मात्र प्रभारी जिल्हाध्यक्षावर निवडणूक काढावी लागणार आहे. यावरून काँग्रेसमध्ये निवडणुकीबाबत गांभीर्यच नसल्याचे दिसते.
नागपूर जिल्ह्याचे दोन भाग करून भाजपने काटोल आणि रामटेक जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती केली. काटोलचे जिल्हाध्यक्ष म्हणून मनोहर कुंभारे यांची तर रामटेक ग्रामीणची जबाबदारी आनंदराव राऊत यांची निवड केली. दोघांनाही काम करण्यास अडचण येऊ नये म्हणून मतदारसंघाचीही वाटणी केली. यातूनच भाजपने किती पद्धतशीरपणे निवडणुकीचे नियोजन केले आहे, याचा अंदाज येऊ शकतो.
दुसरीकडे जिल्हा परिषदेत पाच वर्षे सत्ता उपभोगणारा काँग्रेस पक्ष अजूनही शांतच आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्हाध्यक्ष असलेल्या राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली. त्यांनी रामटेक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यात त्यांना यश आले नाही. मात्र, पक्षाने बडतर्फ केले. त्यानंतर बाबा आष्टणकर यांना प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. कार्याध्यक्ष म्हणून अश्विन बैस काम पाहत आहेत.
जिल्ह्यात महापालिका, नगर परिषद, नगर पंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि शेकडो ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या सहा महिन्यांच्या कालावधीत होत आहेत. काँग्रेसकडे सध्या पूर्णवेळ जिल्हाध्यक्ष नसल्याने या निवडणुका कोणाच्या नेतृत्वात लढणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये अजूनही संभ्रमच आहे. प्रभारी जिल्हाध्यक्ष खरच निवडणूका खांद्यावर घेतील का, याची चिंता कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सतावत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.