Nagpur Municipal Election : हायव्होल्टेज ड्रामा; भाजपच्या ‘त्या’ उमेदवाराला कार्यकर्त्यांनीच डांबलं घरात, नेत्यांची धावपळ

BJP internal conflict : बाहेरच्यांना दिलेल्या उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. १५१ जागेसाठी १८०० कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली होती.
Nagpur Election News
Nagpur Election News Sarkarnama
Published on
Updated on

BJP internal conflict : भाजपने नागपूरमध्ये एकाच जागेसाठी दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने मोठा असंतोष उसळून आला आहे. प्रभाग क्रमांक तेरामधील भाजपने किसन गावंडे आणि विजय होले या दोघांना एबी फॉर्म दिला होता. यापैकी होले यांचा अर्ज स्वीकृत झाला आहे. तर गावंडे यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज आहे. गावंडे यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी नेते दबाव टाकत असल्याचे बघून कार्यकर्त्यांनी त्यांना घरात कोंडून ठेवले होते.

महापालिकेच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ आहे. भाजपच्या नेत्यांकडे बंडखोरांना थंड करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नागपूरमध्ये एकूण सहा प्रभागांतील एका जागेवर भाजपने दोघांना एबी फॉर्म दिला आहे. याशिवाय अनेक बंडखोरांनी रिंगणात उडी घेतली आहे.

गावंडे हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तयारीत असल्याचे समजताच त्यांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमले. त्यांनी घराला बाहेरून कुलूप लावत गावंडे कुटुंबाला कोंडले. गावंडे यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जाऊ द्यावे, अशी विनंती केली जात होती. पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जवळपास अडीच तास हा ड्रामा सुरू होता.

Nagpur Election News
Mahapalika Election : सावधान! रोख रक्कम घेऊन जात असाल तर 'ही' काळजी घ्या, निवडणूक आयोग गय करणार नाही, काढला आदेश

अखेर भाजपचे आमदार परिणय फुके यांना गावंडे यांच्या घरी यावे लागले. त्यांनी घरात काहीवेळ गावंडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर दोघेही घराबाहेर आले. फुकेंनी गावंडेंना आपल्या गाडीतूनच तिथून नेले. त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला. पण त्यानंतरही कार्यकर्त्यांची नाराजी मात्र कमी झालेली दिसत नाही.

दरम्यान, बाहेरच्यांना दिलेल्या उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. १५१ जागेसाठी १८०० कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली होती. उमेदवारांची नावे आधीच जाहीर केली तर मोठा गोंधळ उडण्याची शक्यता वर्तविली जात होती. याची खबरदारी भाजपने आधीच घेतली होती. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून बोलवून प्रत्येकाच्या हाती एबी फॉर्म दिला होता.

Nagpur Election News
Teacher Recruitment : TET बाबत मोठी बातमी; ‘या’ शाळांमधील शिक्षकांबाबत महत्वाचा निर्णय, नव्या वर्षात पहिला धक्का

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर अधिकृत उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली होती. सर्वाधिक चुरस व प्रबळ दावेदार असलेल्या प्रभागांमध्ये दोघांना एबी फॉर्म देण्यात आले होते. मात्र ज्या उमेदवाराने आधी अर्ज भरला त्याचा फॉर्म स्वीकारण्यात आला आहे. दुसऱ्या उमेदवाराचा एबी फॉर्म रद्द झाला आहे.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे वास्तव्य असलेल्या प्रभागात श्रीकांत आगलावे आणि सुबोध आचार्य तर महाल परिसरातून बंडू राऊत आणि धीरज चव्हाण यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. आगलावे आणि राऊत यांचा अर्ज स्वीकृत झाला आहे. मागील निवडणुकीत याच जागेवरून भाजपात मोठा असंतोष उसळून आला होता. आगलावे आणि आचार्य यांचे कार्यकर्ते एकमेकांवर भिडले होते. मोठा राडा होण्याची शक्यता निर्माण झाली होती. शेवटी गडकरी यांनी दोघांचेही तिकीट कापले होते. यावेळी पुन्हा दोघांना एबी फॉर्म देऊन भाजपने आणखीच वाद ओढवून घेतला आहे.

भाजप नेत्यांमधील भांडणामुळे बंडू राऊत यांचा धक्कादायक पराभव झाला होता. धीरज चव्हाण यांना तिकीट देण्याचे भाजपने ठरवले होते. मात्र बंडू राऊत यांनी हट्ट करून तिकीट आणले होते. आता भाजपचे अपक्ष ठरलेल्या उमेदवार निवडणुकीती माघार घेतात की बंडाचा झेंडा फडकवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com