
Nagpur news updates : महापालिका आयुक्त आणि महापालिकेच्या कारभाराच्या विरोधात नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. तीन दिवसांपूर्वी त्यांनी आयुक्तांच्या कक्षात धडक दिली होती. आता त्यांनी इमारत परवानगी व फायर विभागाच्या एनओसीसाठी खंडणी मागितली जात असून याकरिता आयुक्त व त्यांच्या पथकाने दलाल नेमले असल्याचा खळबळजनक आरोप केला.
नागपूर महापालिकेवर सुमारे साडेतीन वर्षांपासून प्रशासक आहेत. आयुक्त अभिजित चौधरी यांच्या विरोधात काँग्रेसच नव्हे तर भाजपच आमदार व नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी चौधरी यांची ताबडतोब बदली करण्याचे आदेश यापूर्वी दोनवेळा दिले. विकास ठाकरे आणि भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभेतही आयुक्ताच्या असहकाराविरोधात आवाज उचलला आहे. मात्र आयुक्त आपल्या जागेवर कायम आहेत.
विकास ठाकरे म्हणाले, शासनाने आमदारांसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार, महापालिका आयुक्तांनी लोकप्रतिनिधींकडून आलेल्या पत्रांना ठराविक कालावधीत उत्तर देणे बंधनकारक आहे. मात्र याचेही पालन आयुक्त करीत नाहीत. आपण विधानसभेचे अध्यक्षांकडे हक्कभंग दाखल केला आहे. त्यानुसार आयुक्तांना नोटीस बजावण्यात आली आहे.
महापालिकेत पैसे मोजल्याशिवाय कुठलेच काम होत नाहीत. इमारतीचा आराखडा मंजूर करण्यासाठी आणि अग्निशमन एनओसी मिळविण्यासाठी लाखो रुपये मागितले जातात. पैसे मागणाऱ्या एका दलालाचा फोनकॉल रेकॉर्ड माझ्याकडे पुरावा आहे. या दलालांना आयुक्तांनीच नेमले असल्याचा दावा ठाकरे यांचा आहे. चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने एजी एन्व्हॉरो आणि बीव्हीजी या दोन कंपन्यांचे करार भ्रष्टाचार आणि सेवा ढासळल्यामुळे रद्द करण्याचा ठराव मंजूर केला होता, असे ठाकरंनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील एका ऑपरेटरकडून दोन झोन हाताळले जातील, अशा नवीन निविदा काढण्याचे निर्देश दिले होते. तरीसुद्धा आयुक्तांनी याची दखल घेतली नाही. यावरून त्यांचे कंत्राटदारांशी साटेलोटे असल्याचे दिसून येते. महापालिकेने हॉकर्स झोन विकसित केले नाही. दुसरीकडे महापालिकेतर्फे हॉकर्सच्या विरोधात सातत्याने कारवाई केली जाते. ते बाजारातील मॉल संचालक, व्यापारी आणि दुकानदारांचे ऐकतात, असे ठाकरे म्हणाले.
महापालिका आयुक्तांनी एक परिपत्रक काढून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करत ऑफलाइन निविदा बंद केल्या. त्यामुळे विविध प्रकारच्या नागरी सेवांवर, विशेषतः झोपडपट्टी भागांतील सेवांवर, प्रतिकूल परिणाम झाला. दुसरीकडे याच आयुक्तांनी स्वतःचे नियम मोडून स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रमाचे निमित्त पुढे करून ऑफ लाइन निविदा काढल्या असाही आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.