
BJP plans strategy for Nagpur Municipal Election win -भाजपने यंदा नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. सक्षम उमेदवारांसाठी विविध पातळ्यांवर चाचण्या करून चाचपणी केली जात आहे. ‘ग्यारह साल मोदी सरकार बेमिसाल‘ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डात छोट्या छोट्या चौक सभा घेतल्या जात आहेत.
या बैठकीत भाजपचे कार्यकर्ते सोडून किमान शंभर लोकांची हजेरी बंधनकारक केली आहे. प्रत्येक बैठकीचा डेटा ठेवला जात आहे. जो शंभर लोक गोळा करू शकत नाही त्याच्या नावावर फुली मारली जाणार असल्याचे जवळपास ठरले असल्याचे समोर आले आहे.
केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने भाजपचा उत्साह चांगलाच वाढला आहे. मागच्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे तब्बल १०८ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे सुमारे साठ वर्षांत भाजपला महापालिकेत प्रथमच स्वबळावर सत्ता स्थापन करता आली होती. यावेळी भाजपचे १५१ पैकी १२१ नगरसेवक निवडून यावे यासाठी बारकाईने नियोजन सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार महापालिकेच्या तिकीटासाठी किमान शंभर लोकांची बैठकीस उपस्थिती ही पहिला अट ठरवण्यात आली आहे. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या इच्छुकांच्या पहिल्या यादीत समावेश केला जाणार आहे. त्यामुळे भाजपला प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी उमेदवार निवडणे सोपे होणार आहे.
चौकसभा आटोपल्यानंतर प्रभाग स्तरावर सभा घेतल्या जाणार आहेत. या सभेचे नियोजन चार माजी नगरसेवकांना किंवा इच्छुकांना करायचे आहे. या सभेला आमदार हजेरी लावणार आहेत. या सर्व सभांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाने लोकांसाठी काय केले, किती लाभ दिले याची माहिती दिली जाणार आहे. राज्य आणि केंद्र शासनाने केलेल्या विकास कामांचा पाढाही वाचला जाणार आहे.
मागील साडेतीन वर्षे महापालिकेत प्रशासक आहे. त्यामुळे महापालिकेच्या स्तरावर लोकप्रतिनिधी नाहीत. कामे होत नसल्याने नागरिकांचा रोष आहे. सहाजिकच याचे खापर सत्ताधाऱ्यांवर फोडले जात आहे. या सभा व बैठकांच्या माध्यमातून लोकांची काय नाराजी आहे हेसुद्धा जाणून घेतले जात आहे. याशिवाय विरोधकांची भाजपविषयी भावना व मतांची नोंद घेण्याची सूचना करण्यात आली आहे. ही नोंद घेताना आक्रमक होऊ नका, आपला विरोधक म्हणून विरोध करू नका तर त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकूण घेण्याचे निर्देश भाजपच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे. या माध्यमातून लोकांची नाराजी शक्य तेवढी दूर करण्याचे प्रयत्नसुद्धा केले जाणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.