
Overview of Nagpur's Upcoming Municipal Elections : महापालिका निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत निवडणूक घेण्याचे निर्देश दिले असल्याने पुन्हा एकदा नागपूर शहरातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. राज्यात भाजप महायुतीचे सरकार असल्याने नागपूर महापालिकेवर आपला झेंडा कायम राखण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे.
विशेष म्हणजे मागील निवडणूक भाजपचे तब्बल १०८ नगरसेवक निवडून आले होते. चार सदस्यांचा प्रभागाचा पॅटर्न भाजपला चांगलाच फायदेशीर ठरला होता. असे असले तरी निम्म्या नगरसेवकांच्या निष्क्रियतेमुळे निर्माण झालेल्या असंतोष भाजप कसा क्षमवणार यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
२०१७ची नागपूर महापालिकेची निवडणूक चांगलीच गाजली होती. काँग्रेसचे प्रमुख नेत्यांमधील वाद टोकाला गेले होते. उमेदवारांची यादी जाहीर होताच काँग्रेसचे नेते हातघाईवर आले होते. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आणि शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या गटाने दीडशे पैकी शंभर जागा खेचल्या होत्या. त्यावरून मोठा राडा झाला होता. उत्तर नागपूरमध्ये माजी मंत्र व नितीन राऊत यांच्या समर्थकांनी काँग्रेसच्या एका नेत्याची गाडी फोडली होती. त्यानंतर तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण प्रचार सभेसाठी आले असता त्यांच्यावर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या कार्यकर्त्यांनी अंडे आणि शाई फेकून आपला रोष व्यक्त केला होता.
त्यानंतर काँग्रेसने महापालिका जिंकण्यापेक्षा एकमेकांना पाडण्यातच आपली सर्व शक्ती खर्च केली होती. याचा फटका काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनाही बसला होता. १५० जागा लढवणाऱ्या काँग्रेसचे फक्त २९ नगरसेवक निवडून आले होते. शिवसेना दोन तर राष्ट्रवादी काँग्रेस एक नगरसेवकांवर थांबली होती. विशेष म्हणजे दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेत बसपाने १० जागा जिंकून मुसंडी मारली होती. याचा जबरदस्त फायदा भाजपला झाला आणि भाजपचे तब्बल १०८ नगरसेवक निवडून आले.
भाजपला प्रथमच नागपूर महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन करता आली. स्पष्ट बहुमतामुळे भाजपचे नगरसेवकही निष्क्रिय झाले. पाच वर्षे काम केले नाही तरी फरक पडत नाही अशाच आविर्भावत अनेक नगरसेवक वावरताना दिसले. भाजपचे सुमारे ५० टक्के नगरसेवक निवडणुकीनंतर प्रभागात कोणालाच दिसले नाहीत. त्यांनी मतदारांसोबत संपर्कही ठेवला नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच मतदारांच्या रोषामुळे महापालिकेत भाजपचे काही खरे नाही असेच वातवरण शहरात निर्माण झाले होते. पाच वर्षांच्या कार्यकाळ संपूण्यापूर्वी भाजपच्या बड्या नेत्यांच्याही ही बाब निदर्शनास आली होती. अनेकांनी आपल्या भाषणातून नाराजी व्यक्त केली होती. अनेक नगरसेवकांना घरी बसवण्याचे संकेत दिले होते.
मात्र तीन वर्ष महापालिकेची निवडणूक होऊ शकली नाही. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या निवडणुकीत घटलेला मतदानाचा टक्का भाजपने विधानसभेच्या निवडणुकीत भरून काढला. दुसरीकडे काँग्रेस पराभवाने शहाणी झाल्याचे दिसत नाही. नेत्यांमधील गटबाजी अद्यापही कायम आहे. अंतर्गत हेवेदावे संपलेले नाहीत. विशेष म्हणजे विकास ठाकरे हे शहर अध्यक्षपदी कायम आहेत. त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक होणार असल्याने अनेक कार्यकर्त्यांना यावेळीसुद्धा आपल्याला तिकीट मिळणार नसल्याची भीती सतावत आहे. काही इच्छुक कुंपणावर आहेत तर काहींनी आधीच दुसऱ्या पक्षात जाऊन आपली सोय केली आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांच्या निष्क्रियतेचा फायदा काँग्रेस कसा उचलतात यावरच त्यांच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.