

Navneet Rana : अमरावतीच्या माजी खासदार, भाजप नेत्या नवनीत राणा आणि युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा या दाम्पत्याने महापालिका निवडणुकीत भाजपशी उघड उघड पंगा घेतला आहे. रविवारी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शो मध्ये सहभाग घेतला. त्यानंतर लगेचच भाजप उमेदवारांच्या विरोधात प्रचार करून वादाला तोंड फोडले आहे. तर रवी राणा यांनी जागावाटपात खेळी करून भाजपच्या 5 उमेदवारांचा निवडणुकीपूर्वीच गेम केला आहे.
युवा स्वाभिमान पक्षाची कमान आमदार रवी राणा सांभाळत आहेत. तर त्यांच्या सहचारिणी, माजी खासदार नवनीत राणा या भाजपच्या नेत्या आहेत. महापालिका निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्द्यावर या दोन्ही पक्षात वितुष्ट आल्यानंतर नवनीत राणा कुणाचा प्रचार करणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. रविवारी (4 जानेवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते, त्यांचा रोड शो झाला. त्यावेळी नवनीत राणा मुख्यमंत्र्यांसोबत होत्या.
त्यानंतर सायंकाळी साईनगर प्रभागातील युवा स्वाभिमानच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी भाजपच्या एका महिला उमेदवाराची उपस्थिती होती. माजी खासदार नवनीत राणा अन्य प्रभागांत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी नेमक्या साईनगर प्रभागात भाजपचे चारही उमेदवार असताना प्रतिस्पर्धी युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचाराचा नारळ फोडल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
भाजपने युवा स्वाभिमान पक्षासाठी 5 जागा सोडल्या होत्या, तर 2 उमेदवारांना कमळ चिन्हावर उभे केले आहे. यामुळे भाजपने 5 जागांवर उमेदवारच दिले नव्हते. पण रवी राणा यांनी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवश खेळी करून ऐनवेळी भाजपच्या उमेदवारांविरोधात उमेदवार दिले. अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवसांपर्यंत जागावाटपचा प्रश्न न सुटल्याने रवी राणांनी 27 जागांवरील अर्ज कायम ठेवले. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये भाजपने या पाचही जागांवर अपक्षांना पुरस्कृत करण्याचे धोरण स्वीकारले आहे.
भाजपने वडाळी-एसआरपीएफ या प्रभागात 2 जागा युवा स्वाभिमानसाठी सोडल्या होत्या, तेथे माजी नगरसेविका सपना ठाकूर व आशिष गावंडे यांना युवा स्वाभिमानने उमेदवारी दिली आहे. तेथे भाजपने उमेदवार दिलेले नाहीत. या प्रभागातील समर्थनाचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. तर गडगडेश्वर व जुनी वस्ती बडनेरा येथील एका जागेवर अपक्ष उमेदवारास समर्थन देत भाजपने युवा स्वाभिमानवरील दबाव वाढविला आहे.
सूतगिरणी प्रभागात मात्र युवा स्वाभिमानच्या उमेदवारास सोबत घेत चार उमेदवारांचे पॅनल भाजपने तयार करीत मैत्रीचा संदेश देण्याचाही प्रयत्न करून संभ्रम तयार केला आहे. दरम्यान, आमदार रवी राणा यांनी भाजपने समर्थित उमेदवार मागे घ्यावे, नंतरच आपण २७ जागांवरील उमेदवारांच्या माघारीचा विचार करू, असा प्रस्ताव भाजपला दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र राणांच्या या प्रस्तावावर भाजपने सावधगिरीची भूमिका घेतली आहे.
राजापेठ प्रभागातील भाजपचे उमेदवार राजेश शादी यांचा अर्ज बाद झाला आहे. तर याच प्रभागातील 1 जागा युवा स्वाभिमानसाठी सोडण्यात आली होती. त्या जागेवर भाजपने उमेदवार दिला होता, मात्र त्याचा बी फॉर्म दाखल होऊ न शकल्याने त्याला अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात यावे लागले आहे. या उमेदवाराचे भाजपने समर्थन केले असून पॅनलमध्ये घेतले आहे. शादी यांच्या बाद होण्याने रिक्त झालेल्या जागेवर युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारास भाजपने समर्थन द्यावे, असा प्रस्ताव आमदार राणा यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.