

BJP rebels emotional strategy in Nagpur elections: महापालिकेच्या तिकीट वाटपावरून सर्वाधिक नाराजी भाजपमध्येच आहे. भाजपने 52 माजी नगरसेवकांचे तिकीट कापले. यापैकी काहींनी पक्षालाच आव्हान दिले आहे. त्यापेक्षा वारंवार डावलण्यात येत असलेल्या बंडवीरांची संख्या भाजपमध्ये जास्त आहे.
या सर्वांनी छुपी युती केली असून मनमानी करणाऱ्या काही बड्या नेत्यांना धडा शिकवण्याचे ठरवले आहे. महापालिकेत 130 नगरसेवक निवडून आणण्याचे टार्गेट ठेवणाऱ्या भाजपला आपल्याच कार्यकर्त्यांचे आव्हान आता पेलावे लागत आहे.
गेल्या निवडणुकीत भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले होते. राज्यात सत्ता आल्यानंतर भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला होता. प्रत्येकाला महापालिकेची निवडणूक लढायची होती. 150 जागेसाठी सुमारे दोन ते अडीच हजार कार्यकर्त्यांनी पक्षाकडे तिकीट मागितले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांचा परफॉर्मन्स बघून भाजपने तिकीट द्यायचे ठरवले होते.
त्यात काही चांगल्या व कार्यक्षम नगरसेवकांचा बळी घेण्यात आला. काहींना तीन ते चार टर्म झाली म्हणून घरी बसवण्यात आले. दरवर्षी तिकीट देतो असे सांगून कार्यकर्त्यांना जुंपणाऱ्यांचाही हिरमोड करण्यात आला. त्यामुळे असंतोषाचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
सहा जागांवर भाजपनेच दोघांना एबी फॉर्म देऊन आपसातील भांडणे आणखीच वाढवली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा वाडा असलेल्या प्रभागात एबी फॉर्म बाद झाल्यानंतरही धीरज चव्हाण नावाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे गडकरी यांचे कट्टर समर्थक असलेले माजी नगरसेवक बंडू राऊत यांना धोका निर्माण झाला आहे.
दक्षिण-पूर्व नागपूरमधील प्रभाग 27 मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी पॅनेल तयार करून बच्चू कडू यांचा प्रहार पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. आपली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजप आमदारांनी इतर पक्षातील कार्यकर्त्यांना फोडले होते. त्यांनाही तिकीट नाकारण्यात आले आहे. हे सर्व नाराज झालेले बंडखोर भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या फळीचा वापर करीत आहेत.
आज आमच्यावर ही वेळ आली उद्या तुमच्यावरही येईल, असे सांगून भाजपच्या कार्यकर्त्यांना भाजप उमेदवारासाठी जास्त सक्रिय होऊ नका, प्रचारात सहभागी होऊ नका, सभा, बैठकांना गर्दी जमवू नका, भाजपने लादलेले उमेदवार पाडा, नेत्यांची मनमानी मोडून काढा, असा सल्ला त्यांना दिला जात आहे. यामुळे सुमारे 25 प्रभागात भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.