

NCP-BJP Alliance: पुसद नगर पालिकेतील सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात युती झाली आहे. नगराध्यक्षपदाी मोहिनी नाईक विजयी झाल्या असून उपनगराध्यक्षपद भाजपकडे जाणार आहे. निवडणूक निकालानंतर वेगवेगळ्या शक्यता व चर्चांना उधाण आले असताना, अखेर सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. विजयी नगरसेवकांच्या संख्येनुसार राष्ट्रवादीला 2 तर महाविकास आघाडीला 1 स्वीकृत नगरसेवक करता येणार आहे. राष्ट्रवादीचे 14, भाजपचे 5 आणि अपक्ष 3 असे एकूण 22 नगरसेवकांचे संख्याबळ महायुतीकडे असणार आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे, नगरपालिकेत पूर्ण बहुमत असल्याने विकासकामे वेगाने मार्गी लावण्यावर आमचा भर राहील, असे स्पष्ट केले.
नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीपूर्वी ठाम भूमिका घेत अडून बसलेल्या भाजपला अखेर निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युतीचा मार्ग स्वीकारावा लागला. निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला अक्षरशः नामोहरण केले. नगराध्यक्ष पदाच्या अटीतटीच्या लढतीत मोहिनी नाईक यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. नदीम यांचा पराभव करीत बाजी मारली. तिहेरी लढतीत सपशेल अपयशी ठरलेल्या भाजपचे केवळ पाच नगरसेवक निवडून आले. मुख्यमंत्री स्तरावर मध्यस्तीचा प्रयत्न होऊनही भाजपचे काही नेते कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता भूमिकेवर ठाम राहिले.
यामुळेच निकालात पक्षाची कामगिरी ढेपाळली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता भाजपला उपनगराध्यक्ष व एका विषय समितीचे सभापतीपद देण्यावर एकमत झाले. आरोग्य सभापतीपदासाठी भाजप आग्रही असताना, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीशी जुळवून घ्या, असा सबुरीचा सल्ला दिल्यानंतर युतीची वाट मोकळी झाल्याची चर्चा आहे. मात्र, भाजपने राष्ट्रवादीशी आधीच युती का केली नाही, यावर नाराज भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीनंतर युती करून तरी काय साध्य केले? अशा तीव्र भावना व्यक्त केल्या.
पुसदच्या राजकीय इतिहासात नाईक घराण्याचा ठसा ठळक आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक हे पुसदचे थेट जनतेतून निवडून येणारे पहिले नगराध्यक्ष ठरले होते. त्यानंतर नाईक घराण्यातील अनिता मनोहरराव नाईक यांना हा सन्मान लाभला. आता वसंतराव नाईक यांच्या नातसून मोहिनी इंद्रनील नाईक यांनी थेट जनतेतून विजय मिळवत नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.