

BMC Election: महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांमध्ये राजकीय वारसदारांचा भरणा आहे. यंदाच्या निवडणुकीत १९ हून अधिक असे उमेदवार आहेत, जे प्रस्थापित राजकारण्यांचे वारसदार आहेत. मात्र, प्रभागातील बदललेली समीकरणे आणि विरोधकांचे तगडे आव्हान पाहता, या वारसदारांचा विजयाचा रस्ता अवघड असल्याचे चित्र आहे.
महापालिकेच्या आखाड्यात यंदा राजकीय घराण्यांतील ‘दुसऱ्या पिढी’चा मोठा भरणा पाहायला मिळत आहे. अनेक खासदार, आमदार आणि माजी मंत्र्यांनी मुलांना, पत्नीला किंवा नातेवाइकांना मैदानात उतरवून राजकीय वारसा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रभागातील गणिते पाहता या वारसदारांचा विजय सहजासहजी होईल असे वाटत नाही. अनेक ठिकाणी चौरंगी लढती आणि बंडखोरीमुळे या उमेदवारांची दमछाक होताना दिसत आहे.
प्रभाग ८९ मधून माजी खासदार विनायक राऊत यांचे पुत्र गीतेश यांच्यासमोर शिवसेनेचे राजेश नाईक आणि काँग्रेसचे कमलेश चौरसिया यांचे आव्हान आहे. गीतेश यांचे भवितव्य काँग्रेसच्या मतविभाजनावर अवलंबून आहे. तर प्रभाग ५४ मधून आमदार सुनील प्रभू यांचे सुपुत्र अंकित मैदानात आहेत. वडिलांच्या आमदारकीच्या प्रभागात त्यांचे पारडे जड मानले जात असले, तरी भाजप आणि वंचित बहुजन आघाडी त्यांना कितपत रोखतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या राजुल पाटील प्रभाग क्रमांक ११४ मधून रिंगणात असून यांच्यासमोर शिवसेनेच्या सुप्रिया धुरत यांचे आव्हान आहे. घरत यांचा दांडगा जनसंपर्क राजुल यांच्यासाठी विजयाचा मार्ग खडतर करू शकतो.
भाजप घराणेशाहीवर टीका करत असली, तरी मुंबईत मात्र अनेक नेत्यांच्या नातेवाइकांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर प्रभाग क्रमांक २२६ मधून निवडणूक लढवत असून त्यांच्यासमोर तगडा विरोधक नसल्याने त्यांचा मार्ग सुकर वाटत आहे. मात्र, त्यांच्या चुलत बहीण गौरवी शिवलकर (प्रभाग २२७) यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांत नाराजीचे सूर आहेत. दुसरीकडे माजी आमदार अशोक धात्रक यांचा मुलगा अजिंक्य धात्रक यांची प्रभाग २२५ मध्ये चौरंगी लढत असल्याने कोणाचे पारडे फिरेल, हे सांगणे कठीण आहे. दुसरीकडे किरीट सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्या प्रभाग १०७ मधून उभे असून यांच्या विरोधात शिवसेना (यूबीटी), मनसे आणि काँग्रेसने ‘वंचित’ला छुपी साथ दिल्याची चर्चा आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीची भिस्त वारसदारांवर आमदार मंगेश कुडाळकर यांचे पुत्र जय हे प्रभाग १६९ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून यांच्यासमोर प्रविणा मोरजकर यांचे आव्हान आहे तर प्रभाग ३४ मधून आमदार अस्लम शेख यांचा मुलगा हैदर शेख निवडणुकीच्या रिंगणात असून आपल्या मुलासाठी मालाडचा बालेकिल्ला राखणे अस्लम शेख यांच्यासाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक (प्रभाग १६५) आणि बहीण डॉ. सईदा खान (प्रभाग १६८) पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत. या प्रभागात देखील चौरंगी लढत होत आहे.
शिवसेनेत ‘लॉटरी’ अन् संघर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही आमदारांच्या नातेवाइकांना झुकते माप दिले. माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर आणि कन्या प्रिया सरवणकर दोघेही मैदानात आहेत. आमदार अशोक पाटील यांचे पुत्र रूपेश पाटील प्रभाग ११३ मधून लढत असून यांचा सामना दीपमाला बढे यांच्याशी होणार असून, येथे काट्याची टक्कर अपेक्षित आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.