Nagpur News : आपल्याकडे चमकोगिरी आणि फोटोसेशन करणाऱ्यांची संख्या भरपूर वाढली आहे. अनेकांच्या डोक्यात हवा शिरली आहे. हे तुम्हाला कळत नसत तरी जनतेला मात्र चांगलेच समजते. अजूनही वेळ गेली नाही. लक्ष घाला. अन्यथा जनता तुमची हवा उतरवेल, असा सावधगिरीचा इशारा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी भाजपचे आमदार, माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना दिला.
आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नागपूर शहरातील पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय अधिवेशनात ते बोलत होते. ते म्हणाले, लोकांना भेटा. त्यांच्या समस्या जाणून घ्या. कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या. सोबत घेऊन चला. अन्यथा कोणाचे काही खरे नाही, असे सांगून नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले.
सध्या राजकीय इन्फेक्शनचा काळ आहे. परीक्षणाचे औषधच त्यावर उपाय आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मला अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. पाच लाखांचे मताधिक्य अपेक्षित होते. दीड लाखही मिळाले नाही. एकाने मला याबाबत विचारणा केली. कदाचित विकासकामे करण्यात मी कमी पडलो असेल किंवा जनतेचे समाधान केले नसावे, असे त्याला सांगतिले.
मी निवडून आलो. आता तुमची परीक्षा आहे. प्रत्येकालाच आमदार आणि नगरसेवक व्हायचे आहे. जागा मोजक्या आहेत, मात्र दावेदार हजार आहेत. 'एक अनार सौ बिमार', अशी परिस्थिती भाजपची (Bjp) आहे.
भाजप हा नेता तयार करणार पक्ष नाही. आपण कार्यकर्ते घडवतो. त्यातून एकालाच कोणाला वर जाण्याची संधी मिळते. कार्यकर्ता होतो म्हणून भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकलो. मात्र, अलीकडे पक्षात प्रत्येकाला नेता बनायची घाई झाली असल्याचे दिसून येते, अशी टीकाही त्यांनी कोणाचेच नाव न घेता केली.
'कुठे कमी पडतो याचा शोध घ्या'
गडकरी यांनी पावसाळ्यात नदी, नाले व रस्त्यांवरचे घराघरांमध्ये शिरण्यावरही भाष्य केले. आमदार व नगरसेवक म्हणून तुम्ही काय उपाययोजना केल्या, अशी विचारणा त्यांनी केली. आपल्या पक्षाने शहरात खूप काही केले आहे. मात्र, ते लोकांना कसे कळेल याचा विचार करा. आपल्याला मते का दिली आणि का नाही दिली यासाठी जनतेत जात रहा. त्यांना विचारा, कुठे कमी पडतो याचा शोध घ्या, असाही सल्ला नितीन गडकरी यांनी यावेळी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.