
Nagpur News : सुमारे 20 वर्षे झाले तरी मिहान प्रकल्पाचे टेकऑफ होताना काही दिसत नाही. या प्रकल्पाचा सर्वाधिक प्रचार व प्रसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केला होता. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असतानाही दुसऱ्या धावपट्टीचा मुद्दा काही निकाली लागत नव्हता. आता या संदर्भातील कोर्टकचेऱ्या संपल्यानंतर धावपट्टीच्या कामाचे उड्डाण होत नसल्याचे बघून गडकरी यांनी मिहान इंडियाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले होते. सोबतच त्यांनी विमानतळ सल्लागार समितीच पुनर्चना करण्याचे निर्देश दिले होते.
मिहान इंडिया लिमिटेडने त्यानंतर विमानतळ सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचीच नियुक्ती केली. त्यानंतर सहअध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची नियुक्ती केली आहे. या समितीत सदस्य म्हणून महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलिस आयुक्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी, वरिष्ठ संचालक एम. ए. अबीद रुही यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील दोन बडे नेते समितीत असल्याने आता मिहान इंडियाचे उड्डाण झटपट होणार असल्याची आशा निर्माण झाली आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ३ हजार २०० मीटर धावपट्टीचे री-कार्पेटिंग अद्याप ते पूर्ण झालेले नाही.
विमानसेवा देणाऱ्या एअरलाईन्सचे उन्हाळ्याचे विशेष वेळापत्रक असते. १ एप्रिल रोजी ते वेळापत्रक जाहीर केले जाते. त्यापूर्वी धावपट्टीचे काम पूर्ण झाल्यावरच नागपूर विमातळावरील फ्लाईट्सची संख्या वाढेल, त्यामुळे एप्रिलपूर्वी धावपट्टीचे काम व्हावे, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे करण्यात आली आहे.
विमानतळाच्या धावपट्टीचे काम रखडलेले असल्याचे लक्षात आल्याने न्यायालयाने या प्रकरणी स्वत:हून जनहित याचिका दाखल करुन घेतली आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली. हे काम 2024 मध्ये दोन टप्प्यात करण्यात येणार होते. अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन न्यायालयाने स्वत: ही जनहित याचिका दाखल केली आहे.
न्यायालयात उन्हाळ्याचा मुद्दा मांडला तसेच उन्हाळ्यापूर्वी धावपट्टीचे काम पूर्ण व्हावे, असे आदेश द्यावे अशी मागणीही केली. याखेरीज ऑक्टोबरपासून आत्तापर्यंत धावपट्टीच्या कामाबाबतची सविस्तर माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सादर करावी, असे आदेश न्यायालयाने यावेळी दिले. पुढील सुनावणी 22 जानेवारी रोजी निश्चित करण्यात आली आहे. न्यायालयीन मित्र म्हणून ॲड. कार्तिक शुकुल यांनी बाजू मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.