
Nagpur News : काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तसेच राज्याचे माजी मंत्री अनिस अहमद यांनी विधानसभेच्या निवडणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने त्यांनी वंचित बहूजन आघाडीत प्रवेश केला होता. एबी फॉर्म घेतल्यानंतर उमेदवारी दाखल करण्यापूर्वीच चोवीस तासांच्या आत ते काँग्रेसमध्ये परतले होते. आता त्यांनी एका कार्यक्रमात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे सर्वच नेत्यांचे रोड मॉडेल असल्याचे सांगून त्यांची जाहीर प्रशंसा करून पुन्हा एकदा राजकीय चर्चेला तोंड फोडले आहे.
माजी मंत्री अनिस अहमद (Anis Ahmad) यांच्या निष्ठेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे याच कार्यक्रमात हिमाचल प्रदेशचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश धर्मानी यांनी गडकरी हे फक्त नागपूरचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नेते असल्याचे सांगून काँग्रेस नेत्यांची अडचण केली आहे.
अनिस अहमद यांच्या शैक्षणिक संस्थेच्यावतीने शनिवार एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना बोलावले होते. आपल्या भाषणात अहमद यांनी कुठलीही भीडभाड न बाळगता व राजकीय परिणामांची चिंता न करता गडकरी यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ते सर्वच पक्षातील नेत्यांचे रोडमॉडेल आहेत. मी नागपूरचा पालकमंत्री होतो. तेव्हा नागपूरमध्ये हज हाऊस बांधण्याचे काम हाती घेतले होते. त्यावेळी माझ्याच पक्षातील काही नेत्यांनी छुपा विरोध केला होता. मात्र, गडकरी यांनी त्यावेळी साथ दिली. त्यामुळे हज हाऊसची निर्मिती करता आली. ते भेदभाव करीत नाही असेही यावेळी अहमद यांनी सांगितले.
त्यांच्याच भाषणाची री ओढून हिमाचल प्रदेशचे मंत्री धर्मानी यांनी महाराष्ट्रच नव्हे तर तिबेट, लेह, लद्दाख यासारख्या दुर्गम भागातही गडकरी यांनी रस्त्यांचे व उड्डाणपुलांचे जाळे विणले असल्याचे सांगितले. त्यामुळे गडकरी हे फक्त नागपूर किंवा महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नेते आहेत. गडकरी हे प्रत्येक मंत्र्यांचा आदर्श असल्याचे सांगून धर्मांनी म्हणाले.
दरम्यान, गडकरींची केलेली प्रशंसा काँग्रेस हायकमांडला कितपत रुचते यावरच या दोन्ही काँग्रेस नेत्यांचे भवितव्य अवलंबून आहे. विशेष म्हणजे यापूर्वी लोकसभेत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनीसुद्धा बाके वाजवून गडकरी यांच्या कामाची प्रशंसा केली होती.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.