
Ravindra Bhoyar Arrested : संघाचा कट्टर स्वयंसेवक म्हणून ओळखले जाणारे नागपूर भाजपचे माजी नेते, शहाराचे माजी उपमहापौर मात्र तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले रवींद्र ऊर्फ छोटू भोयर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. पुनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदीही ते राहिले आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना आज सकाळीच ताब्यात घेतले. तीन वर्षांपूर्वी भोयर यांनी भाजपला(BJP) सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवली होती. ते काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. रवींद्र भोयर हे स्वयंसेवक आहेत. संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीमबाग येथील स्मृति मंदिराच्या शेजारीच ते राहतात. रेशीमबाग प्रभागातूनच महापालिकेच्या निवडणुकीत ते अनेकदा निवडून आले होते.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांचे ते एकेकाळी कट्टर समर्थक होते. संघाच्या पुण्याईमुळे महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देताना त्यांना डावलणे भाजपला अवघड जात होते. नागपूर सुधार प्रन्यासवर विश्वस्त म्हणून त्यांना नेमले होते. तीन वर्षानंतर त्यांना राजीनामा मागण्यात आला होता. मात्र त्यांनी तो देण्यास नकार दिला होता. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोयर यांना राजीनामा देण्यास सांगितले होते.
तेव्हापासून भोयर अस्वस्थ होते. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्यावतीने चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवाराचा शोध घेत होती. भाजपचे मते फोडण्यासाठी भोयर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्षांतर्गत विरोधकांनी चांगलेच घरले होते. स्वयंसेवकाला तिकीट दिल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी शेवटपर्यंत भोयर यांची उमेदवारी मान्य केली नाही. शेवटच्या टप्प्यात काँग्रेसने त्यांचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला. याच निवणुकीत उभे असलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने आपला अधिकृत पाठींबा जाहीर केला होता. या सर्व भानगडीत काँग्रेसचा पराभव झाला. चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) विधान परिषदेत दाखल झाले.
काँग्रेसमध्ये गेल्यानंतर भोयर यांच्या विरोधात भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी ते सुधार प्रन्यासचे विश्वस्त असताना घेतलेल्या वादग्रस्त निर्णयाची चौकशी करण्याची मागणी केली होती. जगनाडे चौकात उभारण्यात आलेल्या पार्किंग प्लाजाची चौकशीसुद्धा लावण्यात आली होती. त्यामुळे भोयर यांच्यापुढील अडचणी वाढल्या होत्या. आता पोलिसांनी अटक केल्याने भोयर आणखीच अडचणीत सापडले आहेत.
भोयर हे पुनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोयटीचे संचालक होते. त्यांच्या कार्यकाळात आठ कोटींच्या ठेवी बँकेतून काढण्यात आल्या होत्या. सोसायटीच्यावतीने एक ले-आऊट टाकून भूखंड विकण्यात आले होते. अनेकांच्या नावावर कर्ज वाटप करण्यात आले होते. ऑडिटमध्ये मृतांच्याही नावावर कर्जाची उचल करण्यात आली असल्याचे समोर आले होते.
ही बँक डबघाईस आल्यानंतर २०१६ ते २०१९ या कार्यकाळाचे ऑडिट करण्यात आले होते. त्यावेळी भोयर संचालक मंडळावर नव्हते. त्यामुळे त्यांना सोडून चार जणांवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. नव्याने स्थापन झालेल्या संचालक मंडळाने २०१० पासून ऑडिट करण्याचा निर्ण घेतला. त्यात भोयरचे सर्व घोटाळ्याचे ‘आका‘ असल्याचे आढळून आले. त्यांच्याविरोधात सरकारी ऑडिटर यांनी गुन्हा नोंदवला होता.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.