Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे यांना शिवसेनेत प्रवेश देऊन रामटेकमधून लढवायचे आणि विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचा पत्ता कट करायचा, यासाठी भारतीय जनता पक्षाने पडद्यामागे खेळी सुरू केली असल्याचा तुमाने समर्थकांचा आरोप आहे. शिंदेंच्या सैनिकांनीही आता तुमानेंसाठी कंबर कसली आहे. भाजपची ती खेळी कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघातून खासदार कृपाल तुमाने यांना डावलून दुसरा उमेदवार लादल्यास आम्ही काम करणार नाही, असा थेट इशारा शिंदे सेनेचे पदाधिकारी व तुमाने यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. त्यामुळे येथील उमेदवारीवरून आणखी पेच वाढला आहे. उमरेड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना शिवसेनेत प्रवेश देऊन रामटेकचा उमेदवार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यास शिवसैनिकांचा विरोध आहे. आपल्याकडे उमेदवार असताना दुसऱ्याची गरजच काय, असा सवाल मुख्यमंत्र्यांना फोनवरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कृपाल तुमाने यांनी रामटेकमधून सलग दोन वेळा निवडणूक जिंकली आहे. लोकसभा मतदारसंघातील १९६० गावांतील नागरिकांसोबत त्यांचा प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद आहे. त्यांच्याविषयी मतदारसंघातील मतदारांची कुठलीच नाराजी नाही. जे विरोध करीत आहेत ते फक्त राजकीय कार्यकर्ते आहेत. त्यांचा बोलविता धनी काही इच्छुक उमेदवार आहे.
भाजपकडे सक्षम उमेदवार नसल्याने केवळ तुमाने यांना विरोध दर्शवण्यासाठी राजू पारवे यांची सोय केली जात असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख इटकेलवार यांचा आहे. पूर्व विदर्भात कृपाल तुमाने हे शिवसेनेचे एकमेव खासदार आहेत. रामटेक मतदारसंघ सोडल्यास संसदेत आवाज उठवण्यासाठी शिवसेनेचा एकही लोकप्रतिनिधी शिल्लक राहणार नाही. शिवसेनेच्या विस्तारालाही ब्रेक लागेल, असेही इटकेलवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रामटेकमधील राजकीय परिस्थिती फोनवरून सांगितली. त्यांनीसुद्धा उमेदवार बदलणार नाही आणि मतदारसंघही सोडणार नाही, असे आश्वासन दिले. तुम्ही निवडणुकीच्या प्रचाराला लागा, असे शिंदेंना सांगितल्याचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार यांनी सांगितले.
खासदार तुमाने यांना डावलल्यास आम्ही निवडणुकीत काम करणार नाही. आपल्याकडे सक्षम उमेदवार असताना इतर पक्षातून उमेदवार आयात करण्याची गरज नाही. तुमाने यांच्या नावाला काही राजकीय कार्यकर्त्यांचा विरोध आहे. जनता शिवसेना आणि तुमाने यांच्यासोबत आहे, असेही इटकेलवार म्हणाले.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.