Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजपचे हेवीवेट नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात लढवण्यासाठी काँग्रेसकडे उमेदवार नसल्याचे भाजप नेते बोलत आहेत. अशा स्थितीत परवा परवा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी नागपूरचे माजी महापौर, काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचे नाव निश्चित करून पक्षश्रेष्ठींकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यानंतर पक्षाने आदेश दिल्यास गडकरींविरोधात नागपुरात लढणार, असे आमदार ठाकरे यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.
भाजपने नितीन गडकरी यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसकडून कोण लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्यंतरी विकास ठाकरे यांच्यासह, आमदार अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार यांची नावे स्पर्धेत होती. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके आणि राष्ट्रीय काँग्रेस कमेटीचे सहसचिव नितीन कुंभलकर यांनीसुद्धा इच्छा दर्शवली आहे. सुरुवातीला ठाकरे, वंजारी आणि मुत्तेमवार यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला होता. त्यामुळे नागपूरच्या उमेदवाराबाबत सर्वांचीच उत्सुकता वाढली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मंगळवारी (ता. 19) माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या निवासस्थानी काँग्रेसचे स्थानिक प्रमुख नेते व पदाधिकारी यांची बैठक झाली आहे. त्यात सर्वानुमते विकास ठाकरे यांनीच नितीन गडकरी यांच्या विरोधात लढावे असा निर्णय घेतला. या प्रस्तावावर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत यांनी अनुक्रमे सूचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या. या बैठकीला माजी मंत्री विलास मुत्तेमवार, आमदार अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, प्रशांत धवड, प्रदीप डांगे, संजय महाकाळकर आदी उपस्थित होते. या संदर्भात विकास ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता नागपूरच्या नेत्यांनी आपल्या नावाचा प्रस्ताव पाठवला असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण लढणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
गडकरी सलग दोनदा आणि एकवेळा बनवारीलाल पुरोहित यांचा अपवाद वगळता काँग्रेसचा उमेदवार येथे नेहमीच निवडून आला आहे. एकेकाळी नागपूर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. नितीन गडकरी यांनी मात्र या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. ते सलग दोन वेळा अडीच ते तीन लाखांच्या मताधिक्याने येथून निवडून आले. नागपूर शहरात ओबीसी, अनुसूचित जाती, जमाती आणि मुस्लिम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे बघता विकास ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्यात कडवा मुकाबला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.