Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात तहसीलदार पदासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार असल्याची जाहिरात दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, या जाहिरातीवरून राज्यात मोठा गोंधळ उडाला. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
एवढंच नाही तर याबाबत विद्यार्थ्यांनीदेखील नाराजी व्यक्त केली होती. यानंतर सरकार खडबडून जागे झाले आणि ही जाहिरात तडकाफडकी रद्द करण्यात आली. याबाबतचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसीलदार पदासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये नायब तहसीलदार, संगणक चालक, लिपिक आणि शिपाई अशा पदांचा उल्लेख जाहिरातीत करण्यात आला होता.
पण या जाहिरातीवरून विरोधकांनी राज्य सरकारला चांगलंच घेरलं. यानंतर आता कंत्राटी तहसीलदार पदासंदर्भातील जाहिरात तत्काळ रद्द करा, असे आदेशच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
याबरोबरच कंत्राटी पद्धतीने तहसीलदारांची पदे भरण्यासंदर्भात सरकारचे असे कुठलेही धोरण नाही, असे स्पष्टीकरण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिले. तर जळगावमध्ये भूसंपादनाच्या कामासाठी अनुभवी लोकांची गरज असल्याने ती जाहिरात काढण्यात आली होती. पण आता ती जाहिरात रद्द करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे विखे पाटील म्हणाले.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.