

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयाला धमकीचे पत्र आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. राज्याची उपराजधानी मानल्या जाणाऱ्या या शहरातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासह रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला लक्ष्य केल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे.
सोमवारी 27 एप्रिल रोजी टपालाद्वारे नागपूर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या कार्यालयात एक निनावी पत्र पोहोचले. स्वतःला डीएसएस नावाच्या संघटनेशी जोडणाऱ्या व्यक्तीने इंग्रजीत लिहिलेल्या या पत्रात अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप आणि धमक्या करण्यात आल्या आहेत. पत्रात संघ मुख्यालय, स्मृतिमंदिर आणि काही मेट्रो स्थानकांवर सिझीयम-137 या किरणोत्सर्गी पदार्थाची पावडर टाकल्याचा दावा करण्यात आला आहे.
या पदार्थामुळे मोठ्या प्रमाणावर आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला. इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी मेट्रो परिसरात सापडलेल्या स्फोटक साहित्याशीही स्वतःचा संबंध असल्याचे सांगत पुढे आणखी मोठी कारवाई करण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रात संघाच्या विचारसरणीवरही आक्षेपार्ह शब्दांत टीका करण्यात आली आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासन तात्काळ सतर्क झाले. दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएस ला तपासासाठी बोलावण्यात आले. त्याचबरोबर एनडीआरएफ आणि अणुऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने विविध ठिकाणी तपासणी करण्यात आली.
संघ मुख्यालय, रेशीमबाग परिसर, भाजप कार्यालय आणि मेट्रो स्थानके येथे अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने सखोल तपासणी झाली. मात्र या तपासणीत कुठेही किरणोत्सर्गी पदार्थ आढळला नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, या घटनेनंतर नागपूर शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रकार केवळ खोडसाळपणा आहे की यामागे काही मोठे षड्यंत्र दडले आहे, याचा तपास पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.