
Nagpur News : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सलील देशमुख हे आजही शरद पवार यांच्यासोबत आहेत. सलील देशमुख यांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर यापूर्वीच दिली होती. मात्र त्यांनी यास नकार दिला होता. विधानसभेची निवडणूक ते काटोल विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढले. ते पराभूत झाले आहेत.
अजित पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत सलील देशमुख यांनी त्यांना सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. सोबत अजितदादांच्या शुभेच्छांचे स्टेटस आपल्या व्हॉट्ॲपवर त्यांनी ठेवले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. देशमुख दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे संकेत देत असल्याच चर्चा या स्टेटसने सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना अजित पवार आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे कौटुंबिक संबंध होते. अनिल देशमुख ज्या ज्या वेळी राज्यात आघाडीची सत्ता होती. त्यावेळी मंत्रिमंडळात होते. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात ते गृहमंत्री होते. आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर अजितदादा हेसुद्धा चाळीस आमदारांसह महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले.
महायुती सरकारने उपमुख्यमंत्री करून दादांना त्याचे आवडते वित्त खाते दिले आहे. विदर्भातील अनेक आजी-माजी आमदारांसह माजी केंद्रीयमंत्री व राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल हेसुद्धा दादांच्या राष्ट्रवादीत आहे. सलील देशमुख यांनाही राष्ट्रवादीत येण्याची ऑफर देण्यात आली होती.
विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सलील देशमुख यांनी हिवाळी अधिवेशनाच्या काळात अजित पवार यांची भेट घेतली होती. तेव्हाही अशाच चर्चा सुरू झाल्या होत्या. आता त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांचे स्टेटस ठेवले आहेत. त्यामुळे ते दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना अधिकच जोर आला आहे.
सलील देशमुख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. ते पुन्हा जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार असल्याचे सांगण्यात येते. काटोल विधानसभा मतदारसंघातील विकास कामे आणि प्रकल्पांबाबत ते नेहमीच दादांच्या राष्ट्रवादीत असलेल्या मंत्र्यांना सातत्याने भेटत असतात. निवेदने देत असतात. काटोलचा संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू करावा यासाठी त्यांनी कृषिमंत्री कोकाटे यांची भेट घेतली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.