
बुलडाणा : मुलाच्या वाढदिवसाला तलवारीने केक भरवणे, सुरक्षेसाठी सोबत असलेल्या पोलिक कर्मचाऱ्याला गाडी धुवायला लावणे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला अकरा लाखांचे बक्षिस देण्याचे विधान तसेच बदलापूर प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू घेतांना वापरलेली भाषा यामुळे कायम वादात आणि चर्चेत राहणारे बुलडाण्याचे शिवसेना आमदार (Sanjay Gaikwad) संजय गायकवाड पुन्हा नव्या वादात अडकले आहेत.
ज्या मतदारांनी गायकवाड यांना दोन वेळा विधानसभेवर निवडून पाठवले त्यांनाच शिव्या घालत असल्याचा त्यांना नवा प्रताप समोर आला आहे. (Buldhana) निवडणुकीत जय-पराजय, मताधिक्यात वाढ-घट होत असते. परंतु एखाद्या गावातून किंवा भागातून कमी मतदान झाले म्हणून त्या मतदारांना शिव्यांची लाखोली वहायची नवी पद्धत संजय गायकवाड यांनी राजकारणात आणली आहे का? असा प्रश्न त्यांचे विधान ऐकल्यावर निश्चितच पडतो.
बुलडाणा जिल्ह्यातील मातोळा तालुक्यात जयपूर गावात आमदार संजय गायकवाड यांचा दुसऱ्यांदा आमदार झाल्याबद्दल सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषण करताना कमी मतदान मिळालेल्या गावातील मतदारांवर टीका करतांना आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा पातळी सोडल्याचे दिसून आले. दारू, मटण, दोन आणि पाच हजारात तुम्ही विकले गेले, तुमच्या पेक्षा... बऱ्या असे संतापजनक शब्द वापरत गायकवाड यांनी मतदारांनाच शिव्या घातल्या.
गायकवाड यांचा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मतदारांना फक्त दारू, मटण पाहिजे, मतदार विकले गेले आहेत, असे म्हणत गायकवाड यांनी खालची पातळी गाठल्याचे यावेळी दिसून आले. जाहीर भाषणात आमदार गायकवाड हे मतदारांवर चांगलेच भडकले होते. तुम्हाला फक्त दारू, मटण, पाचशे रुपये पाहिजे दोन आणि पाच हजारात तुम्ही विकले जाता, असा आरोप करत गायकवाड यांनी मतदारांवर राग काढला.
सत्ताधारी शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार असलेले संजय गायकवाड यापुर्वी अनेकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडले आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्यांना समजही दिली होती. मात्र गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका थांबायलाच तयार नाही. कधी ते विरोधकांना चुन चून के मार खायेंगे म्हणत धमकावतात, तर कधी वाढदिवसाचा केक तलवारीने भरवतात. आता या नव्या विधानामुळे ते वादात सापडले असून यावेळी त्यांनी मतदारांनाच शिव्यांची लाखोली वाहिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.