

MLA Sanjay Gaikwad: चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांच्या बुलढाण्यातील शक्तिप्रदर्शनानंतर आता शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनीही चिखली मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. धाड येथे आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमात गायकवाड यांच्यासह त्यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांच्यावर जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी, सेलिब्रिटींची उपस्थिती आणि हजारो नागरिकांची गर्दी यामुळे कार्यक्रमाला मोठे राजकीय स्वरूप आले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने चिखलीच्या राजकारणात गायकवाडांनी आपली ताकद दाखवून दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी श्वेता महाले यांचे पती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात मोठे शक्तिप्रदर्शन झाले होते. या कार्यक्रमाला विविध राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. त्यानंतर महाले यांनी धनुष्यबाणाचा इशारा करत ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्याचा वापर केल्याने गायकवाड-महाले यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी उघड झाला. त्यावर गायकवाड यांनीही ‘राजकारणातला बाप कोण आहे, हे योग्यवेळी दाखवून देऊ,’ असा इशारा दिला होता.
महाले यांच्या शक्तिप्रदर्शनाला गायकवाडांचा ‘रिप्लाय’?
श्वेता महाले यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर काही दिवसांतच चिखली मतदारसंघातील धाड येथे संजय गायकवाडांनी केलेले शक्तिप्रदर्शन त्यामुळे राजकीयदृष्ट्या लक्षवेधी ठरले आहे. विशेष म्हणजे, याच कार्यक्रमात कुणाल गायकवाड यांचीही उपस्थिती आणि त्यांच्यावर झालेली फुलांची उधळण यामुळे गायकवाडांकडून पुढच्या पिढीची राजकीय तयारी सुरू आहे का? याचीही चर्चा रंगली आहे.
काही दिवसांपासून संजय गायकवाड यांनी चिखली विधानसभा मतदारसंघात सक्रियता वाढवली आहे. काही दिवसांपूर्वी कुणाल गायकवाड यांचा वाढदिवस चिखलीत साजरा करताना गायकवाडांनी महाले गटाच्या प्रभावाला थेट आव्हान दिल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर महाले गटानेही बुलढाण्यात शक्तिप्रदर्शन करत आपली ताकद दाखवली.
मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांनाही गायकवाडांचा अप्रत्यक्ष संदेश?
या संपूर्ण राजकीय संघर्षात विद्याधर महाले यांची भूमिकाही महत्त्वाची ठरत आहे. विद्याधर महाले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव आहेत. श्वेता महाले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांची राजकीय उपस्थितीही चर्चेत आली होती. त्यावरून गायकवाडांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचा दाखला देत वाढदिवसाच्या कार्यक्रमांवरून महाले यांच्यावर टीका केली होती. आता त्याच पार्श्वभूमीवर गायकवाडांनी चिखली मतदारसंघात हजारोंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केल्याने हा केवळ दहीहंडीचा कार्यक्रम होता की महाले गटाला राजकीय प्रत्युत्तर? असा सवाल उपस्थित होत आहे.
कुणाल गायकवाडांची ‘लॉन्चिंग’?
या शक्तिप्रदर्शनातील आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे कुणाल गायकवाड यांची उपस्थिती. जेसीबीतून फुलांची उधळण, तरुणांची मोठी गर्दी आणि सेलिब्रिटींची उपस्थिती या सगळ्या वातावरणात कुणाल गायकवाड यांची उपस्थिती राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरली आहे. चिखली मतदारसंघात आगामी काळात कुणाल गायकवाड यांना सक्रियपणे पुढे आणण्याची तयारी सुरू आहे का, असा प्रश्न यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. याआधीही कुणाल यांच्या माध्यमातून चिखलीत राजकीय मोर्चेबांधणी होत असल्याची चर्चा झाली आहे.
महायुतीत दोन आमदार; पण स्थानिक राजकारणात ‘फाईट’
भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे महायुतीचे घटक पक्ष आहेत. मात्र बुलढाणा जिल्ह्यात श्वेता महाले आणि संजय गायकवाड यांच्यातील राजकीय संघर्ष अधूनमधून उघडपणे समोर आला आहे. एका बाजूला महाले गटाकडून बुलढाण्यात शक्तिप्रदर्शन, तर दुसरीकडे गायकवाडांकडून चिखलीत ताकद दाखवण्याचा प्रयत्न, अशी परिस्थिती दिसत आहे.
त्यातच केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी विद्याधर महाले यांना दिलेली ‘जादू की झप्पी’ आणि त्यानंतर गायकवाडांची चिखलीतील वाढलेली सक्रियता यामुळे बुलढाण्यातील महायुतीच्या स्थानिक राजकारणाकडे अधिक बारकाईने पाहिले जात आहे. या भेटीमागे कोणतेही विशिष्ट राजकीय समीकरण असल्याची अधिकृत पुष्टी मात्र झालेली नाही.
चिखलीत पुढचा डाव कोणाचा?
श्वेता महाले यांच्या शक्तिप्रदर्शनाला संजय गायकवाडांनी धाडच्या दहीहंडीतून दिलेले उत्तर हा योगायोग आहे की ठरवून केलेला राजकीय ‘रिप्लाय’, याची चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र, चिखलीत आपली राजकीय ताकद वाढवण्याचा गायकवाडांचा प्रयत्न अधिक आक्रमक होत असल्याचे चित्र या घडामोडीतून दिसत आहे.
एकीकडे भाजप आमदार श्वेता महाले, त्यांच्यासोबत सक्रिय झालेले विद्याधर महाले आणि त्यांना मिळणारा स्थानिक राजकीय पाठिंबा; तर दुसरीकडे चिखलीत स्वतःची ताकद वाढवणारे संजय गायकवाड आणि पुढे येत असलेले कुणाल गायकवाड—या संघर्षातून बुलढाण्यात महायुतीतीलच नवा ‘पॉवर गेम’ आकार घेतोय का? याचे उत्तर आगामी राजकीय घडामोडींमध्ये मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.