
अमरावती : महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भातील एकूण सात विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. यापैकी सहा आमदार निवडून आले आहेत. विदर्भातील स्ट्राईट 99 टक्के राहिला. पण आता अमरावतीच्या संजय खोडके यांना विधान परिषदेत पाठवून राष्ट्रवादीने आमदारांची संख्या 7 केली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळी अजित पवार यांनी विदर्भाला बरोबरीचा वाटा दिला जाईल असे स्पष्ट केले होते. खोडके यांना उमेदवारी देऊन दादांनी आपला शब्द पाळला आहे.
संजय खोडके आधी मंत्रालयात नोकरीला होते. उपमुख्यमंत्री असताना छगन भुजबळ, आर.आर. पाटील यांचे ते स्वीय सहायक, विशेष कार्य अधिकारी होते. त्यामुळे मंत्रालयात आणि राजकारणात त्यांचे सुरुवातीपासूनच घनिष्ट संबंध आहेत. संघटन कौशल्यासोबत खोडके यांचा जनसंपर्क सुद्धा प्रचंड आहे.
याच जनसंपर्काच्या जोरावर संजय खोडके यांनी पत्नी सुलभा यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले. 2004 मध्ये त्यांनी बडनेरा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय मिळवला. 2009 मध्ये त्यांचा पराभव झाला. याच दरम्यान, संजय खोडके यांनी नोकरीच राजीनामा दिला आणि तेही राजकारणात सक्रिय झाले. अजित पवार यांची सावली म्हणून वावरु लागले.
2014 मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला खोडके दाम्पत्याने उघड विरोध केला होता. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली होती. त्यानंतर ते काँग्रेस पक्षात गेले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सुलभा खोडके यांचा पराभव झाला. 2016 मध्ये स्वतः संजय खोडके यांनी अमरावतीमधून पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्यांनाही अपयश आले.
त्यानंतर खोडके दाम्पत्य पुन्हा राष्ट्रवादीत परतले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आघाडीची ॲडजेस्टमेंट म्हणून सुलभा खोडके यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला. पण त्या केवळ तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसच्या आमदार होत्या. मनाने पतीसोबत राष्ट्रवादीतच होत्या. अजित पवार चाळीस आमदार घेऊन बाहेर पडल्यांनतर खोडके दाम्पत्यही त्यांच्यासोबत गेले.
त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याच्या आरोप करत काँग्रेसने सुलभा खोडके यांचे निलंबन केले. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि 10 मिनिटात उमेदवारी जाहीर झाली. यंदा सुलभा खोडके पुन्हा निवडून आल्या आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसने संजय खोडके यांना उमेदवारी दिल्याने एकाच घरी दोन आमदार अमरावतीकरांना बघायला मिळणार आहे.
काहीही असले तरी संजय खोडके यांना अमरावतीमधून डावलने दोन्ही काँग्रेसला शक्य झाले नाही. अमरावतीमध्ये पॉवर फुल नेते म्हणून संजय खोडके यांची ओळख आहे. संपूर्ण विदर्भातच त्यांचा जनसंपर्क आहे. प्रत्येक शहरात त्यांचे स्वतःचे नेटवर्क आहे. अजितदादा यांना विदर्भात खासकरून पश्चिम विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी खोडके यांची मोठी मदत होणार आहे.
जोडीला अमरावतीमध्ये राणांपुढे आव्हान उभे राहणार आहे. कारण खोडके पती-पत्नीला भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाते. अमरावतीच्या राजकीय मैदानात या दोन्ही दाम्पत्यांचा कायमच एकमेकांशी संघर्ष पहायला मिळतो. 2014 नंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही हा संघर्ष बघायला मिळाला होता.
महायुती असूनही खोडके यांनी राणांचे काम करायचे लांबच पण आपले नाव आणि फोटो वापरायलाही विरोध केला होता. राणांच्या पराभवाला खोडके यांनी हातभार लावला होता. स्थानिक राजकारणात राणा यांना बच्चू कडू, यशोमती ठाकूर यांच्यासोबत खोडके दाम्पत्याचे आव्हान आजही आहे. आता या आव्हानाला अजितदादांनी आणखी एक आमदारकी देऊन आणखी ताकद दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.