Nitin Gadkari Akola News : आज घेतली शेतकऱ्यांची विशेष काळजी; पण ‘या’ कारणामुळे चर्चेत आली शिवारफेरी !

Sarkarnama Impact : मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे काल पहिल्या दिवशी शेतकऱ्यांना काहीच बघता आले नाही.
Dhananjay Munde, Nitin Gadkari and Others
Dhananjay Munde, Nitin Gadkari and OthersSarkarnama
Published on: 
Updated on: 

Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दरवर्षी विद्यापीठ स्थापना दिवसानिमित्त विदर्भातील शेतकऱ्यांसाठी शिवारफेरीचे आयोजन करण्यात येते. विद्यापीठाने संशोधित केलेले तंत्रज्ञान, संशोधन शेतकऱ्यांपर्यंत जावे, या उद्देशाने शेतकऱ्यांसाठी शिवारफेरीचे आयोजन करण्यात येते. मात्र, यावर्षीची शिवारफेरी ही चांगलीच चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसेच आहे. (Due to the minister's visit, the farmers could not see anything on the first day)

मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे काल (ता. २९) पहिल्या दिवशी शेतकऱ्यांना काहीच बघता आले नाही. सुरक्षेच्या कारणावरून पोलिस शेतकऱ्यांना अडवत होते. याशिवाय साधी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था विद्यापीठाने केली नव्हती. पहिल्या दिवशी शेतकऱ्यांची शिवारफेरीत गैरसोय झाल्यानंतर ‘सरकारनामा’ने याची बातमी दिली. त्यानंतर आज शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विद्यापीठाने विशेष काळजी घेतली.

या शिवारफेरीत खासगी कंपन्यांच्या वाणाच्या पिकांचे प्रात्यक्षिक दाखवल्याने शिवारफेरीत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या भुवया उंचाविल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाकडून खासगी कंपन्यांचा प्रचार अन् प्रसार कशासाठी, असा सवाल शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरवर्षी विदर्भातील शेतकरी कृषी विद्यापीठाच्या शिवारफेरीची आतुरतेने वाट पाहत असतात. शेती समृद्ध करण्यासाठी विद्यापीठाने कृषीसंदर्भात केलेलं नवीन संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विदर्भातील शेतकऱ्यांसाठी शिवारफेरी म्हणजे एक पर्वणीच असते.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिवसानिमित्त दरवर्षी तीनदिवसीय शिवारफेरीचे आयोजन करण्यात येते. विदर्भातील अकराही जिल्ह्यांतील शेतकरी तीन दिवस वेगवेगळ्या प्रकारे सहभागी होत असतात. शेतकऱ्यांना दरवर्षी विद्यापीठातील वेगवेगळ्या पीक संशोधन त्या-त्या विभागांत नेऊन त्यांना विद्यापीठाने केलेल्या संशोधनाची माहिती देण्यात येते. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच शिवारफेरी दरम्यान आलेल्या शेतकऱ्यांना एकाच प्रक्षेत्रावर विविध पीक वाणांचे प्रात्यक्षिक बघता यावे, यासाठी लागवड केलेली आहे.

हे करण्यासाठी मोठा खर्चही विद्यापीठाला करावा लागला आहे. विद्यापीठाच्या वाणासोबतच काही खासगी कंपन्यांचेही प्रात्यक्षिक प्लॉट ठेवण्यात आल्याने अनेक चर्चांना सध्या उधाण आले आहे. त्यामुळे विद्यापीठाची शिवारफेरी यावर्षी चांगलीच चर्चेत आली आहे. पहिल्या दिवशी आलेल्या १२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे संशोधनाची माहिती मिळाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

खासगी कंपन्यांचा प्रचार, प्रसार कशासाठी?

विद्यापीठाकडून आयोजित शिवारफेरीत दरवर्षी पन्नास हजारांवर शेतकरी सहभागी होत असतात. शेतकऱ्यांसाठी ही खास पर्वणी असते. मात्र, यावर्षी विद्यापीठाकडून खासगी कंपन्यांचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न का करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित करून आरोप करण्यात येत आहेत.

Dhananjay Munde, Nitin Gadkari and Others
Akola Embezzlement in scrap sale : भंगाराच्या विक्रीत अफरातफर करणं भोवलं, महापारेषणचे आठ अधिकारी निलंबित !

विद्यापीठातील २० एकर प्रक्षेत्रावर एकाच ठिकाणी २१० विविध पिकांच्या जाती लावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने तेलबिया, कडधान्य, तृणधान्य, कापूस, चारापिके, भाजीपाला पिके व फुलांच्या जाती आदींचा समावेश आहे. मात्र, प्रक्षेत्रावर प्रारंभी खासगी कंपन्यांची फलकं लावण्यात आली असून, विद्यापीठाने विकसित केलेले वाण नंतर लावण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

केवळ शिवारफेरीसाठीच पिकांची लागवड...

कृषी विद्यापीठात वेगवेगळ्या पिकांसाठी संशोधन विभाग आहेत. तिथे विद्यापीठ संशोधन करते. मात्र, यावर्षी केवळ शिवारफेरीचा उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन एकाच ठिकाणी वेगवेगळ्या पिकांची लागवड एकाच ठिकाणी करण्यात आली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात सरकारी खर्च करून पिकांची लागवड करण्यात आली आहे. तसेच खासगी कंपनीकडून बियाणे घेऊन पिकांची लागवड करण्यात आली आहे. यासाठी विद्यापीठाने पिकं चांगली दिसावी, यासाठी अधिक प्रमाणात पिकांची काळजी घेण्यात आली आहे. यासाठी विद्यापीठाला 'अधिक' खर्च करावा लागला असल्याची चर्चा होत आहे.

Edited By : Atul Mehere

Dhananjay Munde, Nitin Gadkari and Others
Akola BJP News: धोत्रे गट 'ॲक्टिव्ह मोड'वर तर पाटील गट 'वेट अँड वॉच' !